आंबेगावातील एसटीचे प्रवासी या कारणांमुळे झालेत त्रस्त... 

डी. के. वळसे पाटील
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

आंबेगाव तालुक्‍यात एसटी गाड्यांचे टायर पंक्‍चर होण्याचे व देखभाल व्यवस्थित केली जात नसल्याने अनेकदा रस्त्यातच एसटी गाड्या बंद पडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. या प्रकाराने प्रवाशांचा खोळंबा होत आहे. 

मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्‍यात एसटी गाड्यांचे टायर पंक्‍चर होण्याचे व देखभाल व्यवस्थित केली जात नसल्याने अनेकदा रस्त्यातच एसटी गाड्या बंद पडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. या प्रकाराने प्रवाशांचा खोळंबा होत आहे. 

पुणे- नाशिक रस्त्यावर मंचर येथे सोमवारी (ता. 11) कळवण ते पुणे या एसटीचा (क्र. एमएच 20 बीएल 4185) टायर पंक्‍चर झाला. मात्र, बदली टायर बसविण्यासाठी असलेला जॅकच नादुरुस्त असल्याने पंक्‍चर काढण्याचे काम ठप्प झाले. पुण्याला जाणाऱ्या एसटी गाड्यांमध्ये गर्दी होती, त्यामुळे रस्त्यावर ताटकळत उभ्या असलेल्या प्रवाशांना अन्य एसटी गाडीत घेतले जात नव्हते. या प्रकाराने प्रवासी त्रस्त झाले होते. महिलांनी संताप व्यक्त केला. या प्रवाशांना तब्बल एक तासानंतर दुसऱ्या एसटीतून पुण्याला पाठविण्यात आले.

दरम्यान, रविवारी (ता. 10) रात्री अमळनेर ते पुणे एसटी (क्र. एमएच 20 बीएल 2403) या गाडीला भोसरी येथे उड्डाण पुलाजवळ अपघात झाला. एसटीत बसलेले आंबेगाव व जुन्नर तालुक्‍यातील चार प्रवासी जखमी झाले. गतिरोधक चालकाच्या लक्षात आला नाही. चालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे एसटीतील प्रवासी पुढच्या बाकावर फेकले गेल्याने जखमी झाले. त्यामध्ये पत्रकार भरत सोनू चिखले (साकोरे, ता. आंबेगाव) यांचा समावेश आहे. त्यांच्या हनुवटीला व जबड्याला जखम झाली असून, दातही पडला आहे. त्यांच्यावर पिंपरी- चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

याबाबत वाहतूक नियमाकडे दुर्लक्ष करून भरधाव एसटी चालविल्याच्या आरोपावरून एसटीचे चालक नितीन भास्कर पाटील (अमळनेर आगार) यांच्या विरोधात भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Travelers suffer as ST buses are shut down in Ambegaon taluka