कोरोनातील संशयास्पद कामांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी | Corona Test | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Test
कोरोनातील संशयास्पद कामांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी

कोरोनातील संशयास्पद कामांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोना काळात अत्यावश्‍यक कामांच्या नावाखाली नियमांचे उल्लंघन करून चुकीच्या पद्धतीने कामे केली आहेत. त्याचे लाखो रुपयांचे बिल काढले आहेत, तर काहींची बिल काढण्याची प्रक्रिया सुरू आहेत. अशा संशयास्पद कामांची त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी दिली.

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या काळात ५०० कोटी पेक्षा जास्त रकमेची कामे करण्यात आली आहेत. यामध्ये आरोग्य विभाग, विद्युत विभाग, क्षेत्रीय कार्यालये यासह इतर विभागांनी मोठ्याप्रमाणात निधी खर्च केले. यामध्ये रुग्णालय अद्ययावत करणे, औषधे, साहित्य खरेदी करणे, कोरोना उपचारासाठी रुग्णालय सुरू करणे, स्मशानभूमींमध्ये सुधारणा करणे, क्वारंटाईन सेटंर, तेथील भोजन व्यवस्था, प्रतिबंधित क्षेत्राची नाकेबंदी करणे, पत्रे मारणे आदी कामे करण्यात आलेली आहेत.

हेही वाचा: Pune : पर्यटनातील स्पीकरचा गोंगाट वन्यजीवांना ठरतोय धोकादायक

कोरोनाच्या काळात नागरिकांना वेळेवर सुविधा देणे, त्यांचे जीव वाचविणे यास प्राधान्य देण्यात आले, त्यामुळे महापालिका आयुक्तांच्या अधिकारात स्थायी समिती व मुख्य सभेची मान्यता न घेता नियमांमध्ये शिथिलता आणून अत्यावश्‍यक कामांना त्वरित मंजुरी दिली. कोरोना काळात अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काम सुरू आहे, कामे केली जात नाहीत असे आरोप करण्यात आले. पण कोरोनाशी लढा देण्यास प्राधान्य देण्यात आल्याने या आरोपांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.

महापालिकेत एक कोटीचे बोगस बिल काढण्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे आता महापालिका प्रशासनाने सावध भूमिका घेतली आहे.

डॉ. कुणाल खेमणार म्हणाले, ‘कोरोना काळातील सरसकट नाही पण काही निवडक व संशयास्पद वाटणाऱ्या काही कामांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र संस्था नियुक्त केली जाणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव लवकरच सादर केला जाणार आहे.

loading image
go to top