Pune : पर्यटनातील स्पीकरचा गोंगाट वन्यजीवांना ठरतोय धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune : पर्यटनातील स्पीकरचा गोंगाट वन्यजीवांना ठरतोय धोकादायक

Pune : पर्यटनातील स्पीकरचा गोंगाट वन्यजीवांना ठरतोय धोकादायक

sakal_logo
By
अक्षता पवार

पुणे : अनलॉकनंतर गड किल्ल्यांवर भटकंतीला नागरिकांची पसंती वाढत आहे. मित्र-मैत्रिणी किंवा कुटुंबीयांसोबत भटकंतीला जाणाऱ्या पर्यटकांकडून मनोरंजनासाठी म्युझिक स्पीकर किंवा ब्ल्यूटूथ स्पीकर घेऊन जाण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र मनुष्यासाठी ठरणारा मनोरंजनाचा हा पर्याय गड-किल्ल्यांच्या परिसरातील वन्यप्राण्यांसाठी धोक्याचे ठरत असल्याची चिंता तज्ञांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: मुंबई, कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपले

याबाबत इला फाउंडेशनचे संचालक व पर्यावरण अभ्यासक डॉ. सतीश पांडे यांनी सांगितले, ‘‘गडकिल्ल्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदेशनिष्ठ (स्थानिक) वन्यप्राणी व पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास असतो. गडकिल्ल्यांच्‍या परिसरात असलेल्या झाडांवर किंवा किल्ल्यांच्या भिंतीतील देवळीत पक्ष्यांचे घरटे असते. नाईट कॅम्पींग किंवा दिवसा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून केल्या जाणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे हे पक्षी आपल्या घरट्यातून बाहेर पडतात व त्यांच्यावर इतर प्राणी किंवा पक्षी हल्ला करतात. तर काही पक्ष्यांना आवाजामुळे आपल्या नैसर्गिक अधिवासातून स्थलांतरित व्हावे लागते. परिणामी प्रदेशनिष्ठ पक्ष्यांची संख्या कमी होत ते लुप्त होण्याच्या मार्गावर पोचतात.

राज्यातील गडकिल्ल्यांवर आढळणारे प्रदेशनिष्ठ प्राणी पक्षी :

जिल्ह्यातील गडकिल्ल्यांवर पिंगळा घुबड, गव्हाणी घुबड, तितर, शिळकरी कस्तूर, शृंगी घुबड, पहाडी लावा, रक्त लोचन घुबड आदी पक्षी आढळतात. त्याचबरोबर जावडी मांजर, मुंगूस, नाराच गरुड, सापमार गरुड, बहिरी ससाणा, तरस, खोकड, साळींदर, भेकर हरिण देखील असते.

महत्त्वाचे मुद्दे :

 • राज्यातील पश्‍चिम घाटातील गड कोटांवर १९ प्रदेशनिष्ठ पक्षी आढळतात

 • यातील १९ पैकी सात पुणे जिल्ह्यातील गड किल्ल्यांवर आढळतात

 • जिल्ह्यात आढळणाऱ्या पक्ष्यांच्‍या काही प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर

 • पर्यटकांकडून केल्या जाणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे पक्ष्यांचे स्थलांतरण

 • स्थलांतरणामुळे पक्षांच्या संख्येत घट

 • प्राण्यांना मुक्तपणे वावर करता येत नाही

हे करणे आवश्‍यक :

 • सह्याद्रीच्या गडकिल्ल्यांवर पर्यटनासाठीच्या वेळा निश्‍चित करणे

 • ध्वनी प्रदूषण करणारे यंत्रणांच्या वापरावर बंदी घालणे

 • ध्वनी प्रदूषणाशी निगडित सक्तीचे कायद्यांची गरज

 • कायद्यांची अंमलबजावणी व पालन होत आहे का हे वेळोवेळी सुनिश्‍चित करणे

 • यासाठी वन विभागाच्या वतीने पथकाची नेमणूक गरजेची

 • यासाठी धोरणात्मक योजना आखणे महत्त्वाचे

 • पर्यटकांनी बेजबाबदार वर्तणूक टाळावी

हेही वाचा: "तुम्ही आदिवासींमध्ये फूट पाडत आहात"; फडणवीसांचा पवारांना टोला

‘‘ऐतिहासिक गोष्टींना पाहण्याच्या दृष्टीने भटकंती करणारे आणि पार्टीसाठी येणारे, अशा दोन प्रकारचे पर्यटक गडावर येतात. पार्टीसाठी येणाऱ्या पर्यटकांकडून मनोरंजनासाठी पर्यावरणाची हानी होणारे कामे केले जातात. तसेच स्पीकर किंवा ब्ल्यूटूथचा वापर करत जोर जोरात गाणे वाजविले जातात. अशा प्रकारच्या पर्यटकांवर वन विभागाच्यावतीने कारवाई करण्यात येत आहे. पर्यटकांकडून गड किल्ल्यांवर ध्वनी प्रदूषण केले जात असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्याकडील साधने जप्त करत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.’’

- राहुल पाटील, उपवनसंरक्षक, पुणे वन विभाग

loading image
go to top