पंधरा लाखांच्या दंड वसुलीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेसाठी स. प. महाविद्यालयाच्या आवारातील झाडे तोडल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात याचिका दाखल करण्यात आली. महाविद्यालय प्रशासन, भाजप, महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती आणि पालिका यांच्याविरोधात ही याचिका दाखल केली आहे.

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेसाठी स. प. महाविद्यालयाच्या आवारातील झाडे तोडल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात याचिका दाखल करण्यात आली. महाविद्यालय प्रशासन, भाजप, महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती आणि पालिका यांच्याविरोधात ही याचिका दाखल केली आहे.

विधीचे शिक्षण घेत असलेल्या मदन खुरे आणि बोधी रामटेके यांनी याचिका दाखल केली. महाविद्यालय, भाजप आणि प्राधिकरण समितीने समिती स्थापन करून या प्रकरणाची चौकशी करावी व आठ दिवसांत अहवाल सादर करावा, सर्व प्रतिवाद्यांनी लेखी माफी मागून भविष्यात असा प्रकार करणार नसल्याची ग्वाही द्यावी, न्यायाधिकरणाने आदेश द्यावीत की, सभा किंवा रॅलीसाठी कायदेशीर बाबींची पूर्तता न करता वृक्षतोड करता येणार नाही, महाविद्यालय आणि भाजपला प्रत्येकी १५ लाखांचा दंड करावा व ही रक्कम वृक्षप्राधिकरण समितीकडे द्यावी व तिचा वापर शहरातील वृक्षसंवर्धनासाठी करावा, एनजीटी कायद्यातील कलम एस १५ नुसार न्यायाधिकरणाने योग्य तो आदेश द्यावा, अशी मागणी या याचिकेद्वारे केली आहे. 

पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी ‘कमवा आणि शिका’ योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी लावलेली झाडे पोलिस संरक्षणात तोडली. ॲड. असीम सरोदे यांच्या मार्गदर्शनानुसार याचिका दाखल केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tree Cutting Fine Recovery Demand for modi speech