होर्डिंगसाठी वृक्षांची कत्तल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

 होर्डिंग (जाहिरात फलक) व दुकानांचे फलक दिसावेत यासाठी रस्त्यांलगतच्या झाडांची सर्रासपणे कत्तल केली जात आहे. यामुळे पर्यावरणाला हानी पोचून शहराचे विद्रूपीकरण सुरू आहे. याकडे महापालिका, पर्यावरण, उद्यान, आकाशचिन्ह परवाना विभागांसह शहर सुधारणा व पर्यावरण संवर्धन समित्यांचे दुर्लक्ष झाले आहे. 

पुणे - होर्डिंग (जाहिरात फलक) व दुकानांचे फलक दिसावेत यासाठी रस्त्यांलगतच्या झाडांची सर्रासपणे कत्तल केली जात आहे. यामुळे पर्यावरणाला हानी पोचून शहराचे विद्रूपीकरण सुरू आहे. याकडे महापालिका, पर्यावरण, उद्यान, आकाशचिन्ह परवाना विभागांसह शहर सुधारणा व पर्यावरण संवर्धन समित्यांचे दुर्लक्ष झाले आहे. 

पिंपरी महापालिकेने रस्त्यांच्या कडेला व दुभाजकांवर वृक्षारोपण केले आहे. रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरलेल्या झाडांचे पुनर्रोपण केले आहे. मात्र, दुकानांचे जाहिरात फलक व होर्डिंग दिसण्यासाठी त्यांची सर्रासपणे कत्तल सुरू आहे. काहींच्या फांद्या छाटल्या आहेत. याबाबत ‘आंघोळीची गोळी’ संस्थेने झाडांचे सर्वेक्षण करून महापालिका व सरकारकडे तक्रार केली आहे. मात्र, त्यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे. नाशिक फाटा ते हिंजवडीदरम्यान पिंपळे गुरव, सौदागर, रहाटणी, वाकड, हिंजवडीत झाडे तोडली आढळली.

महापालिकेच्या आकाश चिन्ह परवाना विभागाने होर्डिंग उभारणीसाठी शहरात ११२१ ठिकाणे निश्‍चित केली आहेत. तेथे १७६९ होर्डिंग लावले आहेत. त्यांची सर्वाधिक लांबी ६० आणि सर्वाधिक उंची २० फूट आहे. यामुळे सहा बाय सहा फुटांपासून ६० बाय २० फुटांपर्यंतचे होर्डिंग आढळतात. 

वृक्षांच्या परिसरात होर्डिंगला परवानगी नसावी. त्यासाठी झाडे तोडू नयेत. त्याला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. वृक्षसंवर्धनासाठी स्वतंत्र अधिकारी असावा. दोषींवर दंडात्मक कारवाई करावी. 
- माधव पाटील, उद्योजक, स्वयंसेवक-आंघोळीची गोळी संस्था


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tree cutting for hoarding