आईवरील प्रेमातून उजाड माळरानावर फुलणार नंदनवन

vakhari
vakhari

केडगाव (पुणे) ः दौंड तालुक्यातील वाखारी येथील आईचं बन हा उपक्रम साता समुद्रापार पोहचला आहे. उजाड माळरानावर केडगावातील एक मित्र एक वृक्ष या परिवाराने हे बन साकारले आहे. या बनात लॅाक डाउनच्याकाळात तीन टप्प्यात तीनशे झाडे लावण्यात आली. या उपक्रमाला अमेरिका, दुबई, ऑस्ट्रेलिया येथून प्रतिसाद मिळाला. एक मित्र परिवाराने पडवी (ता. दौंड) गावानंतर वाखारीत आईचं बन साकारले आहे.

एक मित्र एक वृक्ष या परिवाराने आईच्या नावाने झाड लावण्यासाठी सोशल मीडियावरून नागरिकांना आवाहन केले होते. यामध्ये ३०० नागरिकांनी आपल्या आईच्या नावाने झाडे लावली आहे. यात नागरिकांनी फक्त ट्री गार्ड उपलब्ध करून द्यायचे होते. झाड एक मित्र परिवाराने लावले आहे. वाखारी ग्रामपंचायतीने पाणी उपलब्ध करून दिले आहे. झाडाची उंची पाच ते सहा फूट असून, त्याला ट्री गार्ड व ठिबक सिंचनची सोय लगेच केलेली आहे. एक मित्र एक वृक्ष या परिवाराने यंदा प्रथमच केडगावातून गेलेल्या बेबी कालव्याच्या कडेने फुलांची मोठी झाडे लावली आहेत.  

दौंड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश वत्रे यांनी या उपक्रमासाठी ३० हजार रुपयांचा निधी दिला. या निधीतून संघाने आईच्या बनात पन्नास देशी वृक्षांची लागवड केली आहे. प्रशांत घाडगे (दुबई) यांनी ४० ट्रि गार्ड, तर हनुमंत जगताप (ऑस्ट्रेलिया) यांनी शंभर झाडे दिली आहेत. आनंद कोथंबिरे यांनी २० ट्री गार्ड दिले आहेत. संगणक अभियंता सागर वाटमकर (नाशिक)  यांनी दिलेली शंभर झाडे नारोळी (ता. बारामती) येथे लावण्यात येणार आहेत. ही सर्व झाडे सुमारे सहा फुट उंचीची आहेत. सरपंच शोभा धनाजी शेळके यांनी जेसीबीने खड्डे घेण्याचे सहकार्य केले. 

वाखारी येथील आईच्या बनात जवळपास ५० प्रकारची देशी ३०० झाडे यंदा लावण्यात आली आहेत. यात वड, पिंपळ, औदुंबर, कडुलिंब, नांद्रुक, बेल, ताम्हण, कदंब, बहावा, काटेसावर, देवसावर, पळस, पांगारा, खैर, शंकासूर, पारिजातक, अर्जून, आपटा, कांचनार, बकुळ, बुच आदी वृक्षांचा समावेश आहे.

एक मित्र एक वृक्ष या परिवाराने दोन वर्षापूर्वी याच माळरानावर प्रेमाचं झाड ही संकल्पना राबविली होती. त्यात १६५ झाडे लावली होती. त्यातील १०० टक्के झाडे आज सुस्थितीत आहेत. एक मित्रचा सहावा वर्धापन दिन नुकताच झाडे लावून साजरा करण्यात आला. या ग्रुपने गेल्या सहा वर्षात सात हजार झाडे लावली आहेत. प्रशांत मुथा, धनाजी शेळके, लहू धायगुडे, दादा गावडे, कानिफनाथ मांडगे, डॉ. श्रीवल्लभ अवचट, आबा हंडाळ,  महादेव पंडित सर, सुभाष फासगे, संतोषकुमार कचरे, विकास साहू, डॉ नीलेश लोणकर, डॅा. संदीप देशमुख, राजेश लकडे, गोपी रानवडे, शरद बिटके, ओंकार वत्रे आदींनी या उपक्रमाचे संयोजन केले.  

आईच्या बनात पक्ष्यांना निवारा आणि चारा मिळेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. वनविभागाच्या विविध गावातील कृत्रिम पाणवठ्यावर उन्हाळ्यात पशुपक्ष्यांसाठी एक मित्राच्या वतीने दोन लाख लिटर पाणी सोडण्यात आले आहे.
 - प्रशांत मुथा,
प्रमुख, एक मित्र एक वृक्ष परिवार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com