कलचाचणी विद्यार्थ्यांची; डोकेदुखी पालकांची

Trial-Test
Trial-Test

पुणे - दहावीच्या कलचाचणीसाठी पालकांचा मोबाईल घेऊन या, अशा सूचना काही शाळा विद्यार्थ्यांना देत आहेत. त्यामुळे आपल्या मुलांना कलचाचणी देता यावी, म्हणून थ्रीजी, फोरजी नेटवर्कसह अँड्रॉईड मोबाईलसाठी पालकांना धावाधाव करावी लागत आहे. विद्यार्थ्यांचा कल जाणून घेण्यासाठी होत असलेली ही कलचाचणी मात्र मोबाईलमुळे पालकांची डोकेदुखी ठरू लागली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने तीन वर्षांपासून दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी घेतली जात आहे. यापूर्वी शाळांमधील संगणकावर ही चाचणी घेतली जात होती. यंदा मात्र स्वतंत्र ‘मोबाईल ॲप’ कार्यान्वित केले आहे. शाळांमधील शिक्षकांच्या मोबाईलवर हे ॲप डाऊनलोड करून प्रत्येक शाळेसाठी दिलेल्या लॉगिन आयडीवरुन ही परीक्षा द्यावी, असे अपेक्षित आहे. परंतु, सध्या शहरातील काही शाळांमध्ये कलचाचणीसाठी पालकांचे (ॲड्रॉईड) मोबाईल घेऊन या, अशी अलिखित सूचना विद्यार्थ्यांना दिली जात आहे. विद्यार्थ्यांना शाळेत मोबाईल वापरण्यास मनाई असतानाही, या चाचणीसाठी मात्र मोबाईल आणण्याची मुभा मिळत आहे. पण, शाळांच्या या सूचनांमुळे काही पालकांचे आणि विशेषत: मोलमजुरी करणाऱ्या पालकांची चांगलीच तारांबळ उडत आहे.

ही कलचाचणी दीड तासाची असून त्यात पाच भागात प्रश्‍नपत्रिका आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता एका बॅचमध्ये २० ते ३० विद्यार्थी गृहीत धरले तरी मोबाईलची सोय करणे जिकिरीचे जात आहे. ऑनलाईनची सोय नसल्यास ऑफलाइनही परीक्षा घेता येईल, असे जाहीर केले, तरीही या ॲपमुळे मोबाईलचा डेटा मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे. ‘मोबाईल ॲप’चा अट्टहास का?’, असे शिक्षक नाव न घेण्याच्या अटीवरून सांगत आहेत.

हातावरचं पोट आमचं. नातेवाइकांबरोबर बोलता यावं, म्हणून साधा मोबाईल घेतला आहे. मुलगी सध्या दहावीत शिकत आहे. आता तिला कलचाचणीसाठी स्मार्टफोन घेऊन या, असं सांगितलं आहे. आता चाचणीसाठी फोन कुठून आणायचा, असा प्रश्‍न पडला आहे. आता पोरीसाठी शेजाऱ्यापाजाऱ्यांकडे हात पसरावे लागणार आहेत.
- शोभा माने (नाव बदलले आहे)

कलचाचणीसाठी शाळेत पालकांचा मोबाईल घेऊन येण्यास सांगणे अपेक्षित नाही. मुलांना संगणकापेक्षा मोबाईल वापरणे सोपे असल्यामुळे ही चाचणी मोबाईल ॲपद्वारे घेतली जात आहे. परंतु, अशा तक्रारी येत असल्यास शाळांना विचारणा केली जाईल. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांमार्फत शाळांना सूचना दिल्या जातील.
- डॉ. शकुंतला काळे, अध्यक्ष, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com