पुण्याच्या या भागातील नागरिकांवर खेकडे, रानभाज्या खाऊन पोट भरण्याची वेळ  

सिद्धार्थ कसबे
Wednesday, 16 September 2020

जु्न्नर तालुक्‍यातील नाणेघाट, दाऱ्याघाट, आंबेहातवीज येथील दुर्गादेवी पठार ही पर्यटनप्रेमींसाठी आवडीची ठिकाणे आहेत. वर्षभर येथे पर्यटकांची रेलचेल असते. पावसाळ्यात तर हजारो पर्यटक या ठिकाणांना भेट देत असतात. येथे आलेल्या पर्यटकांमुळे स्थानिक नागरिकांना चांगला रोजगार उपलब्ध होतो.

पिंपळवंडी (पुणे) : जुन्नर तालुक्‍यातील आदिवासी भागात कोरोनामुळे नागरिकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेली अनेक कुटुंबे यामुळे अडचणीत आली आहेत. दररोजच्या जेवणासाठी लागणाऱ्या पालेभाज्या सुद्धा येथे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनेक नागरिक सध्या ओढे, विहिरीतील पाण्यात मासे व खेकडे आणि रानभाज्या खाऊन आपली गुजराण करत आहेत. 

मोदी सरकारने शेतकऱ्यांना रडवलेच
 
जु्न्नर तालुक्‍यातील नाणेघाट, दाऱ्याघाट, आंबेहातवीज येथील दुर्गादेवी पठार ही पर्यटनप्रेमींसाठी आवडीची ठिकाणे आहेत. वर्षभर येथे पर्यटकांची रेलचेल असते. पावसाळ्यात तर हजारो पर्यटक या ठिकाणांना भेट देत असतात. येथे आलेल्या पर्यटकांमुळे स्थानिक नागरिकांना चांगला रोजगार उपलब्ध होतो. परंतु या वर्षी कोरोनामुळे येथील सर्व चित्र बदललेले दिसले. पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेली अनेक कुटुंबे अडचणीत आली आहेत. त्याचप्रमाणे मजुरीसाठी इतर गावी जाणाऱ्या लोकांचाही रोजगार बंद झाला आहे. नाणेघाट हे एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ असल्याने अनेक पर्यटक त्याठिकाणी येत आहेत. यात धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण जास्त असल्याने गावकऱ्यांनी पर्यटन बंदी घोषित केली आहे. 

यंदा अधिक मासावरही कोरोनाचे संकट, जावईबापूंचा हिरमोड

जुन्नरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. येथील आदिवासी भागातून जुन्नरच्या शहरी भागात गावकऱ्यांना आठवडे बाजारासाठी जावे लागत असते. रोजच्या जीवनातील जीवनावश्‍यक वस्तू या जुन्नरमध्ये जाऊनच घ्याव्या लागतात. परंतु, कोरोना काळात जर आपण तेथे गेलो, तर कोरोनाची लागण होण्याची भीती त्यांना वाटते. त्यात वैद्यकीय सुविधा व दळणवळणाची साधने खूप कमी प्रमाणात असल्याने सावधगिरी म्हणून लोक गाव सोडून बाहेर जात नाहीत. 

आदिवासी भागात भाताच्या शेतीशिवाय इतर कोणतेही पीक घेणे शक्‍य होत नाही. त्यामुळे दररोजच्या जेवणासाठी लागणाऱ्या पालेभाज्या सुद्धा येथे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनेक नागरिक हे सध्या ओढे, विहिरी यातील पाण्यात मच्छीमारी करून खेकडे पकडून तसेच रानभाज्या खाऊन आपली गुजराण करत आहेत. सध्या पावसाळा असल्याने नदी ओढ्यात पाणी आहे. परंतु पावसाळा संपल्यानंतर परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती त्यांना सतावत आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन शिक्षणही अडचणीत 
ऑनलाइन शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु, या भागातील अनेक पालकांकडे आपल्या मुलांना मोबाईल विकत घेऊन द्यायला पैसे नाहीत. ज्या काही विद्यार्थ्यांकडे मोबाईल आहेत, त्यांना शिक्षण घेताना अनेकवेळा नेटवर्कचा प्रॉब्लेम येत असतो. त्यामुळे शिक्षणापासून हे विद्यार्थी वंचित राहण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

नाणेघाटाला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देत असतात. त्यामुळे दरवर्षी येथील हॉटेल व्यवसाय उत्तम चालत असे. परंतु कोरोनामुळे यावर्षी पर्यटक येथे आलेले नाहीत. रोजगार पूर्णपणे बंद झालेला आहे. सध्या आमची गुजराण नैसर्गिक साधनसंपत्ती म्हणजेच मासे, रानभाज्या यावरच सुरू आहे. 
- सुभाष आढारी, स्थानिक हॉटेल व्यावसायिक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tribal citizens in Junnar taluka in trouble due to closure of tourism business