आदिवासींच्या "पाऊलखुणां'ना मिळणार उजाळा

संतोष शाळिग्राम : सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

पुणे - आदिवासी संस्कृतीच्या लोप पावत चाललेल्या जुन्या आणि परंपरागत पाऊलखुणांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उजाळा देणार आहे. त्यासाठी या समाजातील परंपरांचा तपशील असलेली हस्तपुस्तिका तयार करण्याचे काम विद्यापीठाने सुरू केले आहे. यामुळे बनावट कागदपत्रांच्या आधारे या समाजात होणाऱ्या घुसखोरीला आळा बसेल.

पुणे - आदिवासी संस्कृतीच्या लोप पावत चाललेल्या जुन्या आणि परंपरागत पाऊलखुणांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उजाळा देणार आहे. त्यासाठी या समाजातील परंपरांचा तपशील असलेली हस्तपुस्तिका तयार करण्याचे काम विद्यापीठाने सुरू केले आहे. यामुळे बनावट कागदपत्रांच्या आधारे या समाजात होणाऱ्या घुसखोरीला आळा बसेल.

विद्यापीठातील मानवशास्त्र विभागाने या प्रकल्पावर काम सुरू केले आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून निधी देण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या प्रमुख डॉ. अंजली कुरणे म्हणाल्या, ""कोलाम, गोंड, महादेव कोळी, ठाकर या जमातींची हस्तपुस्तिका तयार केली जाणार आहे. जमातींमधील सांस्कृतिक परंपरा, प्रथा यांसह जमातींची वैशिष्ट्ये हस्तपुस्तिकेत असतील. त्यायोगे संबंधित जमातींच्या नागरिकांची ओळख पटविणे सरकारला सोपे होईल. कोलाम आणि गोंड या जमातीच्या माहिती संकलनाचे काम पूर्ण झाले आहे.''

""एखाद्या नागरिकाने आदिवासी जमातीच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज केला, तर त्याच्याकडील माहितीची हस्तपुस्तिकेशी पडताळणी करणे शक्‍य होईल. परिणामी, बनावट आदिवासी व्यक्तीची ओळख पडेल, तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे कुणीही आदिवासी असल्याचे प्रमाणपत्र मिळवू शकणार नाही,''असेही डॉ. कुरणे यांनी सांगितले.

आदिवासींच्या 45 जमातींचा मानवशास्त्रीय अभ्यासदेखील विद्यापीठ करणार आहे. याबद्दल सांगताना डॉ. कुरणे म्हणाल्या, ""आदिवासींच्या प्रमुख 45 आणि त्यातील उपजमाती अशा शंभरहून अधिक जमाती आहेत. त्यांच्या आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक स्थितीची अद्ययावत माहिती उपलब्ध नाही. ती या अभ्यासातून मिळू शकणार आहे. तसेच किती जमाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, याची माहितीदेखील पुढे येईल.''

याचा होणार अभ्यास
आदिवासी जमातींमध्ये काळाच्या ओघात कोणते बदल झाले, नामशेष होत चाललेल्या जमाती कोणत्या, त्यांचे भवितव्य काय, जमातीमधील नागरिकांचे उदरनिर्वाहाचे साधन कोणते, त्यांचे स्थलांतर होते आहे का, तसे होत असेल, तर त्यांचे नवे वास्तव्य कोणत्या भागात आहे, त्यांचे आजार, जीवनमान आणि वयमान आदी बाबींचा अभ्यास करून माहिती संकलित केली जाणार आहे. महिनाभरात हे काम सुरू होईल, असे डॉ. कुरणे यांनी स्पष्ट केले.

आदिवासी जमातींच्या कल्याणाची धोरणे निश्‍चित करण्यासाठी हे संशोधन महत्त्वाचे ठरेल. सरकारने या जमातींच्या अभ्यासासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची निवड केली. हा विद्यापीठाच्या गुणवत्तेचा सन्मान आहे.
- डॉ. वासुदेव गाडे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: Tribal culture