पालावरच्या मुली शिकणार पुण्यात ! 

ज्ञानेश सावंत 
रविवार, 5 ऑगस्ट 2018

मला पुण्यात शिकायचे होते. पण राहण्याची सोय नसल्याने मी गावी शिक्षण घेत आहे. मात्र आता राहण्याची सोय होत असल्याने आनंद झाला. चांगले शिक्षण घेण्याचा माझा प्रयत्न आहे. 
- निशा भोसले, विद्यार्थिंनी 

पुणे : पाठीवर बिऱ्हाड असलेली पारध्याची पोर, हीच निशाची ओळख. या ओळखीच्या ओझ्याने तिचे आडनावही झाकलं गेलं. गावातल्या घरांतून जमविलेलं शिळपाकं खाऊन ती शाळेत जाऊ लागली. भटकंती करून पोटाची भूक भागविणाऱ्या तिच्या आई-वडिलांना तिच्या शिक्षणा खर्च झेपणार कसा? त्यामुळं निशाचं शिक्षण चौथीतच थांबलं. पण मोजकेच दिवस... तिची जिद्द पाहून घरच्यांनी तिला पुण्यातल्या आश्रमशाळेत पाठवलं. दहावीनंतर ती गावी परतली. हलाखीपुढे महाविद्यालयीन शिक्षण अशक्‍यच होतं. मात्र निशा आता पुन्हा शिक्षणासाठी पुण्यात येणार आहे. पारधी समाजासह अनुसूचित जमातीतील (आदिवासी) मुलींसाठी पुण्यात वसतिगृह होणार असून, त्यासाठी पारधी समाजातील नगरसेविका राजश्री काळे यांनी पुढाकार घेतला आहे. 

सामाजिक, कौटुंबिक आणि आर्थिक द्रारिद्य्र हे पारध्यांसह आदिवासी समाजातील मुलांच्या पाचवीला पुजलेलं. पारधी समाज म्हटले, की आजूबाजूच्या लोकांची हमखास संशयी नजर. मात्र हा घटक वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे पावले टाकतो आहे. शिक्षणाच्या प्रवाहात येऊन तो स्थिरस्थावर होऊ पाहतो आहे. त्याकरिता तो धडपडतोही आहे. काही केल्या या घटकाची सामजिक आणि आर्थिक घडी बसेनासी झाली. अशाच कात्रीत निशाही अडकली. पुण्यात दहावीपर्यंतचे शिक्षण कसेबसे घेऊन ती पदवीसाठी गावी गेली. तिला प्राध्यापक व्हायचे असल्याने राष्ट्रीय पात्रता चाचणीसाठी (नेट) पूर्वतयारीसाठी पुण्यात यायचे आहे. पण राहणार कुठे असा प्रश्‍न आता तिच्या पुढे उभा राहणार नाही. 

अनुसूचित जमातीतील (एसटी) मुलींना पुण्यात सहजरित्या शिक्षण घेता यावे, या उद्देशाने महापालिकेने बाणेरमध्ये तीनशे मुलींचे वसतिगृह नियोजित केले आहे. त्यासाठी सर्व्हे क्र. (88) मोकळ्या जागेत (ऍमिनिटीज स्पेस) मध्ये स्वतंत्र इमारत उभारण्यात येणार आहे. निशासह राज्यातील अन्य भागांतून पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींना वसतिगृह मिळेल. अकरावी ते पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिंनी पात्र ठरतील. 

उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, ""दुर्बल घटकातील विद्यार्थिंनींच्या सोयीसाठी हे वसतिगृह असेल. पारधी आणि आदिवासी समाजातील तीनशे मुलींची व्यवस्था करण्याचे निवोजन आहे. त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरविण्यात येतील.'' 

मला पुण्यात शिकायचे होते. पण राहण्याची सोय नसल्याने मी गावी शिक्षण घेत आहे. मात्र आता राहण्याची सोय होत असल्याने आनंद झाला. चांगले शिक्षण घेण्याचा माझा प्रयत्न आहे. 
- निशा भोसले, विद्यार्थिंनी 

पारधी समाजातील मुली शिक्षणासाठी पुढे येत आहेत. पण परिस्थितीमुळे त्यांना अडचणी येतात. त्यांना प्रोत्साहन देण्याकरिता वसतिगृहाची योजना आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.'' 
- राजश्री काळे, नगरसेविका 

आदिवासी समाजातील मुला-मुलींसाठी वसतिगृहाची व्यवस्था करण्यात आली, तरी महाविद्यालयातील त्यांच्या प्रवेशाचा प्रश्‍न निर्माण होतो. तो सोडविण्यासाठी आदविासी समाज कृती समितीने पुढाकार घेतला आहे. या मुलांच्या प्रवेशासह काही जणांचे शुल्क भरण्याची योजना समितीने आखली आहे. दरवर्षी शंभर मुला-मुलींना मदत करण्यात येईल, असे समितीचे कार्याध्यक्ष नामदेव गंभिरे यांनी सांगितले. 

Web Title: tribal girl educate in Pune