आदिवासींना बोलीभाषेतून शिक्षण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

पुणे - ‘चुकते कई बातल आयो’ हे माडिया बोलीत लिहिलेले साधना विद्यालयाच्या प्रवेशद्वारावरचे वाक्‍य. याचा अर्थ होतो, चुकलात तरी चालेल. गडचिरोलीतल्या भामरागड तालुक्‍यातल्या नेलगुंडा गावातली ही शाळा. आजूबाजूच्या गावातील आदिवासी विद्यार्थ्यांना माडिया-गोंडी आणि इंग्रजीतून मोफत प्राथमिक शिक्षण देणारी. २०१५ मध्ये साधना आमटे यांच्या स्मरणार्थ समीक्षा आणि अनिकेत आमटे यांनी इथल्या आदिवासी मुलांसाठी ही शाळा बांधली. 

माडिया - गोंडी बोलणाऱ्या आदिवासी विद्यार्थांना थेट मराठी आणि इंग्रजीतून शिक्षण घेताना अनेक अडचणी येतात. त्यांच्या आकलनक्षमतेवर विपरीत परिणाम होतो आणि त्यांचा शिक्षणातला रस संपतो, यासाठी त्यांनी या शाळेत माडिया- गोंडी आणि इंग्रजीतून शिकवायला सुरवात केली. नेलगुंडा, परायनार, गोंगवाडा, महाकापाडी, बटपार, मोरोमेट्टा, मिडदापल्ली, कवंडे या आजूबाजूच्या गावातील १०० विद्यार्थी सध्या इथे शिकतात.

बोलीभाषेतून शिक्षण एवढंच नाही, तर आदिवासी मुलांची त्यांच्या संस्कृतीशी जोडलेली नाळ तुटू नये, यासाठी इथली रचनाच अत्यंत सृजनशील आहे. शाळेत आल्यानंतर रोज काही वेळ मुलं मोहाची फुलं वेचतात, माडिया संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या रेला नृत्यासाठी रोज एक तासिका खास राखून ठेवली असते. मुलं मातीकाम करतात. गोंडीतली लोकगीतं गाणारी मुलं इथं इंग्रजीही आत्मविश्‍वासाने बोलतात.

बोलीभाषेतून शिक्षण आणि शाळेच्या अत्यंत सृजनशील रचनेमुळे इथले विद्यार्थी इतके रमलेले आहेत, की शाळा सुटल्यावरही कुणाला घरी जावंसं वाटत नाही. शिकवताना उदाहरणं म्हणून इथले शिक्षक आदिवासींच्याच रोजच्या जगण्यातले संदर्भ, निसर्गातली उदाहरणं सांगतात. त्यामुळे विद्यार्थी - शिक्षकातलं नातंही मैत्रीपूर्ण आहे. छडी हा प्रकारच इथल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना ठाऊक नाही. मातीकाम, नृत्य, अंकगणित, भाषा आणि इतर विषयांतलीही मुलांची प्रगती बघून पंचक्रोशीतले लोक आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळांऐवजी या शाळेत पाठवू लागले आहेत.

आदिवासी भाषा लोप पावत आहेत, त्याचं एक महत्त्वाचे कारण म्हणजे या भाषा बोलणारा समूहच हळूहळू आक्रसत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेतून शिक्षण दिल्यास भाषासंवर्धनाची शक्‍यता वाढते, शिवाय आदिवासींचाही आपल्या भाषेशी संबंध टिकतो, त्यामुळे बोली भाषांतून शिक्षण देणाऱ्या शाळांची संख्या वाढायला हवी. 
- डॉ. जॉन गायकवाड, मानवशास्त्रज्ञ

Web Title: tribal student mother tongue education