सहकारनगरमध्ये मद्यपींचा त्रास

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

सहकारनगर - नागरिकांना मद्यपींचा त्रास होत असल्याने सहकारनगर पोलिस ठाण्यासमोर असलेले देशी दारूचे दुकाने तत्काळ हटविण्यात यावे, या मागणीसाठी मनसेच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले. त्याला विविध संघटनांनी पाठिंबा दिला असून, परिसरातील महिलांनीदेखील एल्गार पुकारण्याचा इशारा दिला आहे.

सहकारनगर - नागरिकांना मद्यपींचा त्रास होत असल्याने सहकारनगर पोलिस ठाण्यासमोर असलेले देशी दारूचे दुकाने तत्काळ हटविण्यात यावे, या मागणीसाठी मनसेच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले. त्याला विविध संघटनांनी पाठिंबा दिला असून, परिसरातील महिलांनीदेखील एल्गार पुकारण्याचा इशारा दिला आहे.

पोलिस ठाणे व पीएमपी बसथांब्याजवळ हे दुकान आहे; तसेच जवळच एक शाळाही असल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांना मद्यपींचा त्रास सहन करावा लागतो. मद्यपी बसथांब्यावर शिवीगाळ करत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येत आहेत. परिसरारातील रहिवाशांनी याबाबत अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्याची दखल घेण्यात येत नाही. यामुळे मनसे प्रभाग अध्यक्ष आशिष वाघमारे यांनी गेल्या सहा दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. अखिल भारतीय बहुजन सेना, नवजीवन सोसायटी, ओमकार मित्र मंडळ, पद्मावती युवक संघटना, दलित स्वयंसेवक संघ, दलित बेरोजगार संघटना व अण्णा भाऊ साठे तरुण मंडळाने या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.

राणी खत्री म्हणाल्या, ‘‘सहकारनगर परिसरातील बसथांब्याजवळ देशी दारूचे दुकान असल्याने मद्यपी हे नागरिकांना व प्रवाशांना शिवीगाळ करतात. तसेच विद्यार्थ्यांनादेखील हा त्रास सहन करावा लागतो. हे दुकान लवकर न हटविल्यास महिला एल्गार पुकारतील.’’

सहकारनगर पोलिस ठाण्यासमोरील देशी दारूचे दुकान हटविण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मद्यपींच्या त्रासामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले  असल्याचे आशिष वाघमारे यांनी सांगितले.

सरकारी नियमानुसार देशी दारूचे दुकान बंद करणे किंवा हटवण्यासाठी मतदान घ्यावे लागते. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हे दुकान बंद करण्यात येईल.
- शांताराम पाकेरे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग

Web Title: Troubles by drinker