समाजासाठी काम करणारे खरे ‘सेलिब्रिटी’ - डॉ. जोशी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

अलीकडच्या काळात चित्रपटात, वाहिन्यांवर काम करणारे कलाकार म्हणजे सेलिब्रिटी, अशी समज तरुणाईची झाली आहे. परंतु समाजासाठी काम करणारे खरे सेलिब्रिटी आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुम्हीदेखील चांगले काम करा. मोबाईलमध्ये रमण्यापेक्षा इतरांना मदत करा, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी यांनी केले.

कोथरूड - अलीकडच्या काळात चित्रपटात, वाहिन्यांवर काम करणारे कलाकार म्हणजे सेलिब्रिटी, अशी समज तरुणाईची झाली आहे. परंतु समाजासाठी काम करणारे खरे सेलिब्रिटी आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुम्हीदेखील चांगले काम करा. मोबाईलमध्ये रमण्यापेक्षा इतरांना मदत करा, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी यांनी केले.

शिवसाम्राज्य वाद्य पथकातर्फे वाद्यपूजन, शिवसाम्राज्य गौरव पुरस्कार आणि शौर्य सन्मान प्रदान सोहळ्याचे आयोजन एरंडवण्यातील मनोहर मंगल कार्यालय येथे करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या वेळी ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, मंदार बलकवडे, अक्षय बलकवडे, दत्ता सागरे, आनंद सागरे, अनिकेत कालगुंडे, वैभव भालेकर, अभिषेक नागरे, रोहन शिखरे आदी उपस्थित होते. या वेळी गिर्यारोहक उमेश झिरपे यांना शिवसाम्राज्य गौरव पुरस्कार व मेजर सुरेश भोसले यांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.  

ठाकूर म्हणाले, जीवन मरण हे माणसाच्या हातात नाही. परंतु मेजर भोसले यांनी चार जिवांना वाचवून पुनर्जन्म दिले. विजयाचे श्रेय घेणारे आणि विजयामध्ये मी होतो असे म्हणणारे खूप असतात, परंतु विजय तुम्ही मिळवा मी मागे राहतो असे म्हणणारे झिरपे सारखा कॅप्टन एखादाच असतो. हे खरे  समाजातील सेलिब्रिटी आहेत, असेही त्यांनी नमूद केले.  पुरस्काराला उत्तर देताना झिरपे म्हणाले, आजच्या काळात मुलांना खूप जपले जाते. ते खेळताना पडणार नाहीत याची दक्षता पालक घेत असतात. परंतु त्यामुळे मुले धाडसी होत नाहीत. मोठे झाल्यानंतर ही मुले अभ्यासात जरी हुशार असली तरी प्रत्यक्ष जगात धाडस करण्यात ते कमी पडतात. त्यामुळे मुलांमध्ये डिप्रेशन येते. आयुष्यात ध्येय गाठण्यासाठी धाडस करणे गरजेचे असते. हे धाडस खरी चढाई केल्यामुळे निर्माण होते. म्हणून डोंगर, गडकिल्ले, शिखरे चढण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. तसेच मेजर भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. 

अजित वाराणशीवार यांनी सूत्रसंचालन केले, बलकवडे यांनी प्रास्ताविक केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: true celebrity working for the community n m joshi