संगीत हे निर्व्याज आनंदाचे माध्यम - महेश काळे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जुलै 2018

पुणे - संगीत, गायन हे निर्व्याज आनंद मिळविण्याचे आणि देण्याचे माध्यम आहे. गायकाच्या सादरीकरणाने रसिकाला आनंद मिळतो आणि रसिक आनंदी झाला तर गायकाचा आनंद द्विगुणित होतो. सर्वांनी संगीत शिकले तर प्रत्येकाचे वैयक्तिक प्रश्‍न संपतील असे मत गायक महेश काळे यांनी व्यक्त केले. 

पुणे - संगीत, गायन हे निर्व्याज आनंद मिळविण्याचे आणि देण्याचे माध्यम आहे. गायकाच्या सादरीकरणाने रसिकाला आनंद मिळतो आणि रसिक आनंदी झाला तर गायकाचा आनंद द्विगुणित होतो. सर्वांनी संगीत शिकले तर प्रत्येकाचे वैयक्तिक प्रश्‍न संपतील असे मत गायक महेश काळे यांनी व्यक्त केले. 

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित "सांस्कृतिक कट्टा' या गप्पांच्या कार्यक्रमात काळे यांनी अध्यात्म आणि संगीत यांचे नाते, शास्त्रीय, आधुनिक तसेच पाश्‍चिमात्य संगीत आदींविषयी मनमोकळ्या गप्पा मारतानाच कष्टाशिवाय यश मिळत नाही, हेदेखील स्पष्ट केले. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत त्यांनी गुरुविषयी भावना व्यक्त करणारे, "गुरू एक जगी त्राता, गुरु दयासिंधू' हे गीतही गायले. बुजुर्ग गायक, वादक हे पर्वतासारखे आहेत, त्या प्रत्येकाकडून काही ना काही तरी शिकावयास मिळाल्याचे सांगत त्यांनी कोणताही एक कलाकार "फेव्हरेट' नाही, असेही सांगितले. 

रिऍलिटी शोमध्ये मिळालेले यश पचविता आले पाहिजे. यात पालकांची जबाबदारी महत्त्वाची आहे. स्पर्धेतील आर्थिक बक्षिसांपेक्षा गाण्याची आणि मान्यवर गुरूंकडे शिकण्याची संधी मिळणे, हे या मुलांसाठी अधिक योग्य ठरू शकते, असे मत त्यांनी व्यक्‍त केले. इंटरनेटवर प्रत्येक घराण्याचे गाणे ऐकायला मिळत असले तरी "गुगल', हा गुरू होऊ शकत नाही. मी इंटरनेटच्या माध्यमातून शिष्यांच्या संपर्कात राहू शकतो; पण ज्ञानाची प्रत्यक्ष ऊब ही गुरूसमोर बसून शिकतानाच मिळते. अनुभवातील प्रचितीचा पोत उंचाविण्यासाठी गुरू आवश्‍यक असतो, असे सांगत त्यांनी पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे गायनाचे धडे घेताना याचा अनुभव घेतल्याचे त्यांनी नमूद केले. सध्याची शिक्षण पद्धती ही मुलांमधील कलागुण जोपासण्यासाठी प्रोत्साहित करणारी नाही. संगीत, कला, प्रेम आणि सहानुभूती हे प्राथमिक शिक्षणातच विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले पाहिजे, असे मतही काळे यांनी मांडले. 

या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस पांडुरंग सांडभोर, खजिनदार ब्रिजमोहन पाटील उपस्थित होते. मीनाक्षी गुरव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

Web Title: true joy through music says Mahesh Kale