बिजिंगमध्ये ट्रम्प! : ‘करायला गेले एक...’

बिजिंगमध्ये ट्रम्प!  : ‘करायला गेले एक...’
Published on

जगाच्या पाठीवर ------------------------ फोटो वापरावा----------20368

बिजिंगमध्ये ट्रम्प! : ‘करायला गेले एक...’

विनय सहस्रबुद्धे

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही महिन्यांत इतकेवेळा घुमजाव केले आहे की विवेकपूर्ण विचार आणि वक्तव्य यांच्याशी त्यांचे नाते कधी जुळणारच नाही की काय, अशी कोणाचीही धारणा व्हावी. अलीकडचा त्यांचा चीन दौरा त्यांच्या मुखभंग मालिकेचा अलिकडचा अध्याय म्हणायला हवा. अगदी परवा म्हणजे १३ मे २०२६ रोजी ट्रम्प यांनी चीनला भेट दिली. त्या वेळी चीन हा अमेरिकेच्या ‘आरे ला कारे’ करण्याची हिंमत दाखविण्याची क्षमता असलेल्या देशांपैकी एक म्हणून आपले अस्तित्व जाणवू देण्याच्या मूडमध्ये असल्याचे स्पष्ट संकेत दिसत होते. वेगवेगळ्या कारणांमुळे रशियाबरोबर बिघडलेले आणि नीट न झालेले संबंध, इराण बरोबरच्या संघर्षात पोळलेले हात आणि बदलते विश्व-मानस यामुळे चीनला थोडे चुचकारता येते काय ते बघण्याच्या अघोषित इराद्याने ट्रम्प बीजिंगला गेले खरे; पण व्यापक संदर्भात बघायचे तर त्यांना हात हलवीत परत यावे लागले असे एकूण चित्र आहे. अमेरिका आणि चीन यांच्या धोरणदृष्टीतील फरक या भेटीच्या अखेरीस पुन्हा एकदा अधोरेखित झाले एवढे मात्र खरे.
या बहुचर्चित दौऱ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते ते मुख्यतः दोन कारणांमुळे. पहिले म्हणजे, इराणशी सुरू असलेल्या संघर्षात होत असलेली अमेरिकेची कोंडी. अद्यापही मध्यपूर्वेतील संघर्ष संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत अमेरिका वरचढ असूनसुद्धा इराणने नवनव्या युद्धतंत्रांचा वापर करून वॉशिंग्टनच्या महागड्या लष्करी क्षमतांना प्रत्युत्तर दिल्यामुळे अमेरिका आपणच पसरलेल्या जाळ्यात अधिकाधिक खोल अडकत असल्यासारखे आजचे वातावरण आहे. भरीसभर म्हणून इराणने होर्मुझ सामुद्रधुनीला दबावाचे हुकमी हत्यार म्हणून वापरले. तेहरानने सामुद्रधुनीवर नाकेबंदी लादली आणि त्या मार्गातून जाणाऱ्या प्रत्येक जहाजाकडून दहा लाख अमेरिकन डॉलर शुल्काची मागणी केली. या इराणी नाकेबंदीमुळे अमेरिकेसमोर गंभीर आर्थिक आव्हाने उभी राहिली आहेत. पेट्रोलियम उत्पादनांच्या किमती तर आकाशाला भिडल्या आहेतच पण खतांच्या किमतीही निरंतर वाढतच आहेत. खतांचे भाव वाढण्याचा थेट परिणाम लागवडीवर आणि पुढे अन्नपुरवठ्यावरही होऊ शकतो आणि परिस्थिती आटोक्यात आली नाही तर काही वर्षांनी अन्नधान्याच्या टंचाईचे संकटही उद्‍भवू शकते असे काही जाणकारांना वाटते. दुसरे म्हणजे, स्वतःला शांतीदूत म्हणवून घेत नोबेल पुरस्काराची आस बाळगून असलेल्या ट्रम्प यांना रशिया-युक्रेन संघर्षातही मध्यस्थी करता आलेली नाही. सुरुवातीला ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना पाठिंबा दर्शविला होता, परंतु नंतर आपली लष्करी ताकद पुन्हा उभारण्यासाठी रशिया जाणूनबुजून हा संघर्ष लांबवित असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला. ट्रम्प यांच्या या धरसोड वृत्तीमुळेच ऑगस्ट २०२५मध्ये अलास्कामध्ये झालेली ट्रम्प-पुतीन अधिकृत बैठकही असफल ठरली अशी सार्वत्रिक धारणा आहे. इराण बरोबरचा संघर्ष संपविण्यासाठी चीन ने इराणवर दबाव आणावा असा अमेरिकेचा मनोदय होता; पण चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी वाटघाटीतला गोडवा वरपांगी शाबूत राखूनही अमेरिकेची डाळ काही शिजू दिली नाही.
अनेक निरीक्षकांनी नोंदवलेल्या मतानुसार या अध्यक्ष ट्रम्प यांचा हा दौरा म्हणजे निव्वळ ‘शब्द बापूडे केवळ वारा’ अशा प्रकारचा होता. जवळपास दशकभरानंतर एक अमेरिकी राष्ट्राध्यक्ष चीनला भेट देत होते आणि पहिल्यापासूनच ट्रम्प यांचा आविर्भाव या दौऱ्यात आता काही तरी भव्य दिव्य घडणार आहे अशा प्रकारचा होता. बैठकीपूर्वी आणि रात्रीच्या जेवणादरम्यान ट्रम्प यांचे लष्करी संचलनाने स्वागत झाले. हातात झेंडे घेऊन ते फडकवणाऱ्या लहान मुलांनी त्या सरकारी स्वागतावर लोक सहभागाचा मुलामा चढविण्याची औपचारिकताही पूर्ण झाली. अशा सर्व प्रसंगात अध्यक्ष ट्रम्प यांनी चीनी संस्कृती आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे प्रथे प्रमाणे भरभरून कौतुकही केले. इतके सारे घडूनही प्रत्यक्षात अमेरिकेच्या हाती काहीच लागले नाही हे वास्तव नाकारता येत नाही. या दौऱ्यानंतर ट्रम्प यांनी माध्यमांना सांगितले की उभय नेत्यांनी मिळून दोन्ही देशांसाठी उत्कृष्ट असे काही शानदार व्यापार करार केले आहेत आणि चर्चा ‘अत्यंत यशस्वी’ झाली आहे. वस्तुस्थितीत मात्र अध्यक्ष ट्रम्प यांच्या या दाव्यांनंतरही ‘त्या उत्कृष्ट’ करारांबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. चीनने बॉइंग या अमेरिकन कंपनीची २०० विमाने खरेदी करण्यास सहमती दर्शविली आहे, असा अमेरिकेचा दावा आहे. दौऱ्यापूर्वी चर्चेत असलेल्या ५०० विमानांच्या आकड्यापेक्षा हा आकडा कमी आहे हे तर खरेच पण खुद्द चीनने अद्यापही त्याला ठाम दुजोरा दिलेला नाही. चीन अमेरिकेकडून ‘अब्जावधी डॉलर्स’ किमतीचे सोयाबीन खरेदी करणार असल्याचा दावा तर व्हाईट हाऊसने प्रसिद्ध केलेल्या ‘फॅक्ट शीट’मध्येही करण्यात आला आहे; पण चीन त्याबाबतचे मौन सोडून तपशील सांगण्यास तयार नाही. बीजिंगने केवळ दोन्ही बाजूंनी विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नमूद केले आहे. याचाच अर्थ असा की अमेरिकेच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दडपणाला कोणत्याही प्रकारे बळी न पडता चीनने आपलेच म्हणणे खरे करून दाखविले आहे. युद्धाबाबतच्या चीनच्या भूमिकेचेही तसेच. अमेरिका -इराण युद्धाबाबत चीनने पहिल्यापासूनच या युद्धाच्या विरोधात ठाम भूमिका घेतली होती आणि खुद्द ट्रम्प चीनचा प्रत्यक्ष पाहुणचार घेत होते तेव्हाही चीनने या युद्धाच्या विरोधातील आपली भूमिका खंबीरपणे आणि स्पष्टपणे मांडली हे विशेष उल्लेखनीय आहे; पण चीनचे नेते शी जिनपिंग यांनी भाषणात एका प्राचीन युद्धाचा दिलेला संदर्भ उल्लेखनीय आहे. त्यांनी शिखर परिषदेच्या उद्‍घाटन भाषणात अथेन्स आणि स्पार्टाच्या दरम्यान इसवीसन पूर्व ४३१मध्ये सुरू झालेल्या आणि दशकभर टिकलेल्या युद्धाचा उल्लेख केला आणि विचारणा केली की ‘चीन आणि अमेरिका’ ‘थ्यूसिडिडीस ट्रॅप’ म्हणून ओळखलेल्या संकल्पनेच्या पलीकडे जाऊ शकतात का आणि मोठ्या शक्तींमधील नातेसंबंधांसाठी एक नवे प्रारूप निर्माण करू शकतात का?
हा ‘थ्यूसिडिडीस ट्रॅप’ किंवा सापळा ही एक कूटनीतिक संकल्पना आहे आणि तिचा अर्थ म्हणजे जेव्हा एखादी उदयोन्मुख सत्ता स्थिर असलेल्या सत्तेला विस्थापित करण्याचा धोका निर्माण करते, तेव्हा युद्ध होण्याची शक्यता वाढते. शी जिनपिंग हे सुचवू पाहत होते की विश्व पटलावर चीन चा उदय होत असताना प्रस्थापित विश्व-सत्ता मानली जाणारी अमेरिका युद्धखोरीच्या वाटेने जाणार की चीनचा उदय सहन करणार? ‘‘अथेन्सच्या उदयामुळे स्पार्टात निर्माण झालेल्या भीतीपोटी युद्ध अपरिहार्य झाले’’, असे मत ग्रीक इतिहासकार थ्यूसिडिडीसने त्यांच्या ‘हिस्ट्री ऑफ पेलोपेनेशियन वॉर’ या ग्रंथात मांडले आहे. चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांनी ही सज्ञा अनेकदा वापरली असली तरी अमेरिकी अध्यक्षांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक संदर्भ मांडणे याचा नेमका अर्थ काय? बहुदा तैवान संदर्भात काही पूर्वसूचना देण्याचा त्यांचा इरादा असावा असेही कहीजणांना वाटते. ‘‘तैवानचा प्रश्न चीन-अमेरिका नात्यातील सर्वांत महत्त्वाचा मुद्दा आहे’’, असे शी जिनपिंग म्हणाले ते हे सर्व लक्षात घेता दुर्लक्षित करण्याजोगे नक्कीच नाही.
कदाचित यामुळेच की काय, मायदेशी परतल्यावर ‘ट्रुथ सोशल’ या समाज माध्यम मंचावर ट्रम्प यांनी लिहिले की ‘‘आता, युनायटेड स्टेट्स जगात सर्वांत तेजस्वी राष्ट्र आहे, आणि आशा आहे की चीनसोबत आपले नातेसंबंध पूर्वीपेक्षा अधिक बलिष्ठ आणि चांगले राहतील.’’ ट्रम्प मुखभंग मालिकेतला हा अलिकडचा अध्याय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com