युक्रेनमध्ये भारतीय सैन्य तैनात करावे

युक्रेनमध्ये भारतीय सैन्य तैनात करावे
Published on

वॉशिंग्टन, ता.२४ (वृत्तसंस्था) ः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळावर आधारित नव्या पुस्तकातील काही दाव्यांमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात चर्चा रंगली आहे. उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स यांनी युक्रेनमध्ये शांतिसेना म्हणून भारतीय सैनिक तैनात करण्याचा प्रस्ताव मांडला होता, मात्र ट्रम्प यांनी तो हसण्यावारी नेल्याचा दावा करण्यात आला आहे, असा दावा ‘रेजिम चेंज ः इनसाइड द इम्पेरियल प्रेसिडेन्सी ऑफ डोनाल्ड ट्रम्प’ या पुस्तकात करण्यात आला आहे.
‘न्यूयॉर्क टाइम्स’चे पत्रकार मॅगी हेबरमन आणि जोनाथन स्वान यांनी हे पुस्तक लिहिले आहे. गेल्या वर्षी ३० जानेवारी रोजी व्हाईट हाउसमधील ओव्हल ऑफिसमध्ये उच्चस्तरीय बैठक झाली होती. या बैठकीत संरक्षण, परराष्ट्र आणि राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी तसेच उद्योजक एलॉन मस्क उपस्थित होते. रशिया-युक्रेन युद्ध समाप्त करण्याच्या संभाव्य पर्यायांवर चर्चा हा बैठकीचा मुख्य उद्देश होता, असे पुस्तकात नमूद केले आहे.

‘भारतीय असे कधीच करणार नाही’
लेखकांच्या दाव्यानुसार, ‘नाटो’ देशांचे सैनिक युक्रेनमध्ये पाठविण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असताना व्हान्स यांनी त्याला विरोध दर्शविला. त्यामुळे रशियाची नाराजी आणखी वाढू शकते, असे त्यांचे मत होते. त्याऐवजी भारत किंवा सौदी अरेबियासारख्या युरोपबाहेरील देशांच्या सैनिकांची शांतिसेना उभारण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांचे बोलणे ऐकून ट्रम्प हसले. भारतीय लोक असे कधीच करणार नाहीत. ते अशा कोणत्याही गोष्टीसाठी पैसे खर्च करणार नाहीत, असे ट्रम्प यांनी म्हटल्याचा दावा पुस्तकात केला आहे. ‘‘भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे अत्यंत चांगले मित्र आहेत आणि त्यांना अमेरिकेत यायचे आहे, मात्र भारतीय लोक बाहेरील गोष्टींसाठी कधीही पैसे खर्च करत नाहीत,’’ असेही ट्रम्प यांनी नमूद केले होते. याचबरोबर, ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांचा उल्लेख एक ‘कमकुवत मध्यस्थ असा केला.

भारताच्या आयातशुल्कावर संताप
पुस्तकातील दुसऱ्या एका प्रकरणात तंत्रज्ञान क्षेत्र आणि भारताशी संबंधित एका मोठ्या घटनेचा उल्लेख आहे. व्हाईट हाउसमध्ये दहा मार्च रोजी ‘टेक्नॉलॉजी सीईओ कौन्सिल’ची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ‘आयबीएम’, ‘डेल’, ‘एचपी’, ‘क्वालकॉम’ आणि ‘इंटेल’ यांसारख्या दिग्गज कंपन्यांचे प्रमुख सहभागी झाले होते. अमेरिकेत नवीन कारखाने का उभारत नाहीत, असे अमेरिकेचे वाणिज्य मंत्री हावर्ड लुटनिक यांनी या कंपन्यांच्या प्रमुखांना विचारले तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी हस्तक्षेप करत भारत आणि चीनवर मोठ्या प्रमाणावर आयात शुल्क लावण्याबाबत भाष्य केले.
ज्या कंपन्या अमेरिकेत उत्पादन करणार नाहीत, त्यांना १०० टक्क्यांपर्यंत आयात शुल्क भरावे लागेल, असे ट्रम्प यांनी या कंपन्यांच्या प्रमुखांना सांगितले. आमच्यावर मोठा अन्याय होत असल्याचे सांगत ट्रम्प म्हणाले की, चीन अमेरिकी वस्तूंवर १५० ते २०० टक्के कर लावतो आणि भारत १७५ टक्के कर वसूल करतो. ट्रम्प त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात कोणत्याही सल्लागाराचे ऐकण्याऐवजी पूर्णपणे स्वतःचे निर्णय आणि व्यावसायिक विचारसरणीनुसार काम करत असल्याचे या पुस्तकातून स्पष्ट होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com