महिला अत्याचार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना : पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 ऑगस्ट 2018

पुणे : महिलांवरील अत्याचार, छेडछाड टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याबरोबरच उद्योजकांना भितीमुक्त व्यवसाय करण्याच्या दृष्टीने इंडस्ट्रिअल, लॅंड, वाळू व माथाडी अशा माफियांच्या मुसक्‍या आवळण्यास सुरवात केली आहे. 110 टोळ्यांची यादी बनवून, त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. तसेच, वाहतुकीच्या समस्येवरही लक्ष्य केंद्रित केले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली. 

ग्रामीण पोलिस दलाच्या वतीने जिल्ह्यातील नागरिक, महिला, उद्योजक यांच्यासाठी सुरू करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. अतिरिक्त पोलिस अधीक्षक संदीप जाधव, बारामती विभागाचे अपर पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले या वेळी उपस्थित होते. 

निर्भया पथकांची संख्या 16, तर दामिनी पथकांची संख्या 22 पर्यंत वाढवली आहे. याबरोबरच महिलांना त्रास होत असलेल्या शैक्षणिक संकुल, बाजारपेठा, बसथांबे, अशा "हॉटस्पॉट'ची निवड करून तेथे सुरक्षिततेवर भर देत आहोत. त्रास देणाऱ्या व छेडछाड करणाऱ्या 4 हजार तरुणांवर कारवाई केली आहे. अनेकांचे समुपदेशन केले आहे, तर 22 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तक्रार पेटीतील तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली जात आहे. पोलिस काका, पोलिस काकी उपक्रम राबवून महिला दक्षता समितीची क्षमता 100 पर्यंत वाढविली आहे. विद्यार्थिनी सुरक्षा समितीही स्थापन केली आहे. त्यांना स्वसंरक्षणाचे धडेही दिले जात असल्याचे पाटील यांनी सांगितले. 

गुंडांवर कठोर कारवाई 

ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत शिक्रापूर-सणसवाडी, रांजणगाव, बारामती, भिगवण, जेजुरी अशा अनेक औद्योगिक वसाहती येतात. त्यामध्ये दोन हजारांहून अधिक उद्योग सुरू आहेत. मात्र, काही गुंडांकडून उद्योजकांना त्रास दिला जातो. अशा 110 टोळ्यांची यादी बनविली आहे. त्यांच्यावर एमपीडीए, मोका अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतून पाच महामार्ग जातात. खेड, चाकण, नगर रस्ता येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक आराखडा करण्यास सांगितले आहे. महामार्गावरील प्रत्येक पोलिस ठाण्यात एक वाहतूक विभाग व त्यांना आवश्‍यक मनुष्यबळ देण्यात येणार आहे. खेड-चाकण वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 100 जण काम करतील. 

- संदीप पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक 
 
Web Title: Trying to reduce woman Harassment says SP Patil