सभापतींनी एकाच दिवसात गाठले जनावरांचे चार बाजार 

भरत पचंगे
Sunday, 22 November 2020

जनावर बाजार विस्तारासाठी पुणे जिल्ह्यासह नगरमधील चार जनावर बाजारांमधील व्यापा-यांना समक्ष भेटून बाजाराला नियमित येण्याची निमंत्रणे दिली आहेत. 

शिक्रापूर : पिंपळे-जगताप (ता.शिरूर) येथील उपबाजारात दहाच दिवसांपूर्वी जनावर बाजार सुरू झाला आणि पहिल्याच बाजारात विक्रमी ८० लाखांची उच्चांकी उलाढाल झाली. हेच यश डोळ्यापुढे ठेवून सभापती शंकर जांभळकर यांनी आता या जनावर बाजार विस्तारासाठी पुणे जिल्ह्यासह नगर जिल्ह्यातील चार जनावर बाजारांमधील व्यापा-यांना समक्ष भेटून बाजाराला नियमित येण्याची निमंत्रणे दिली. एकाच दिवसात तब्बल ५० जनावर व्यापा-यांच्या होकारानंतर ते आज पिंपळ्याच्या उपबाजारात हजर राहून बाजार समिती व्यवस्थापनाला सर्व माहिती दिली.

जबाबदारी स्वीकारणारेच यशस्वी ठरतात; पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना मूलमंत्र

चार महिन्यांपूर्वी सभापतीपदी विराजमान झाल्यावर जांभळकर यांनी संस्थेच्या उप्तन्नवाढीसह शेतक-यांना कमाल सेवा-सुविधा देण्यासाठी कांद्याचा मोघळ बाजार, पाबळ येथील तरकारी बाजार सुरू करण्यासाठी गाळे लिलाव आणि शिरुर, तळेगाव-ढमढेरे येथील सर्व कृषी सेवा सतर्क करण्याचे काम सुरू केले.

याच पार्श्वभूमिवर दहा दिवसांपूर्वी पिंपळ्यात सुरू केलेल्या जनावर पहिल्याच बाजारात ८० लाखांची उलाढाल झाल्याने त्यांच्या बाजाराबद्दल अपेक्षा वाढल्या आणि त्यांनी पिंपळ्यात कमाल संख्येने व्यापारी यावेत म्हणून चाकण (ता. खेड), घोडेगाव (ता. आंबेगाव) या पुणे जिल्ह्यातील जनावर बाजारांसह लोणी-प्रवरा व काष्टी (दोन्हीही जि. नगर) येथील जनावर बाजारांना भेटी देवून तेथील बड्या जनावर व्यापा-यांना पाचारण केले.

वरील चारही बाजारांतील ५० व्यापारी आता पिंपळ्यात दर मंगळवारी उपस्थित राहणार असून, सर्व प्रवर्गातील गाई, सर्व जातीतील म्हैस, बैल, कालवडी, रेडे, शेळी, मेंढी आदी सर्व जनावरांची खरेदी-विक्री कमाल संख्येने होईल यासाठी हा प्रयत्न केल्याची माहिती सभापती जांभळकर यांनी दिली.

दरम्यान नगर जनावर संघटनेचे अध्यक्ष एस. व्ही. सावंत, व्यापारी रझ्याक शेख, वसंतशेठ काळे आदी व्यापा-यांनी काष्टी येथे जांभळकर यांचा विशेष सत्कार केला तर या पुढे शिरुर बाजार समितीशी कायमचे नाते तयार झाल्याची ग्वाहीही यावेळी दिली. यावेळी रामदास बोत्रे, काळू सातपुते, आबा अगसकांडे, अजित दरेकर, अंकुश खेडकर, बाळासाहेब भंडारे, उपसचिव अनिल ढमढेरे आदींही शिष्ठ मंडळसदस्य उपस्थित होते. 

Corona Updates: दिवाळीनंतर कोरोनाचा प्रसार वाढला; 24 तासांत 45 हजारांपेक्षा जास्त रुग्ण

...मेंढपाळवस्तीवर- कोरोनाकाळातील लॉकडाऊन शिथील झाल्यावर सभापती जांभळकर तालुक्यातील सर्व मेंढपाळवस्त्यांना भेटी देवून आले व मेंढपाळांच्या शेळी-मेंढी खरेदी-विक्रीच्या बाबतीतल्या गरजा त्यांनी समजून घेतल्या. याच गरजा बाजार समितीच्या पथ्यावर पाडून घेण्यासाठीच पिंपळ्याचा उपबाजार आग्रहपूर्वक सुरू केल्याची माहिती उपसचिव अनिल ढमढेरे यांनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Turnover of Rs. 80 lakhs in Pimple-Jagtap sub-market