Vidhan Sabha 2019 : बारामतीत दुपारी बारापर्यंत २५ टक्के मतदान

मिलिंद संगई 
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

बारामती शहर : बारामती विधानसभा मतदारसंघात सकाळी अकरा वाजेपर्यंत 20.7 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली. गेली दोन दिवस बारामती शहर व परिसरात पावसाचा जोर कायम होता. परंतु आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मतदार उत्साहाने मतदानाला बाहेर पडल्याचे चित्र दिसत होते.

Vidhan Sabha 2019 :  बारामती : बारामती विधानसभा मतदारसंघात सकाळी अकरा वाजेपर्यंत 20.7 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली. गेली दोन दिवस बारामती शहर व परिसरात पावसाचा जोर कायम होता. परंतु आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मतदार उत्साहाने मतदानाला बाहेर पडल्याचे चित्र दिसत होते.

दुपारनंतर पुन्हा पाऊस येईल या भीतीने अनेकांनी पाऊस नसल्याने सकाळीच करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सकाळी दहा नंतरच बारामतीतील अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या. दुपारी बारापर्यंत साधारण पंचवीस टक्क्यांच्या आसपास बारामतीत मतदान झाले आहे.

बारामती विधानसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार यांनी काटेवाडी येथे आपल्या कुटुंबीयांसह मतदान केले. त्यानंतर अजित पवार यांनी बारामती शहरातील विविध मतदान केंद्रांची पाहणी केली. दरम्यान, आज अनेक मतदान केंद्रांवर वयोवृद्ध मतदारांचे चांगलेच हाल झाले. रस्त्यापासून मतदान केंद्र बरेच आत असल्यामुळे व व्हीलचेअर ठेवलेल्या असताना स्वयंसेवकांची कमतरता असल्यामुळे वयोवृद्ध मतदारांना याचा मनस्ताप सहन करावा लागला.

 याशिवाय पतीचे मतदान वेगळ्या मतदान केंद्रावर व पत्नीचे मतदान वेगळ्या केंद्रावर असाही अनुभव अनेक दांपत्यांना आला. त्यामुळे दोन दोन ठिकाणी मतदानाला जाण्याची वेळ अनेक मतदारांवर आली. आज मतदान केंद्राच्या परिसरांमध्ये पावसाने अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य होते, या चिखलातून वाट काढत मतदान केंद्रापर्यंत मतदारांना जावे लागले. मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असल्याची माहिती पोलिस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली.

आज सकाळी माॅकपोल सुरू असताना 11 व्हीव्हीपॅट मशीन मध्ये एरर येत असल्याने 11 ठिकाणची व्हीव्हीपॅट मशीन नव्याने बदलून देण्यात आले. दुपारी बारा वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडल्याची माहिती दादासाहेब कांबळे यांनी दिली. दरम्यान आज अनेक नवमतदारांनी प्रथमच मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर आपल्याला अतिशय आनंद झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

मतदानासाठी धवल वर्धमान शहा हे खास अमेरिकेहून भारतात आले होते. त्यांनी बारामतीतल्या म. ए. सो. विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला. मतदान करण्यासाठी आपण खास आलेलो असल्याचे त्यांनी नमूद केले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: twenty five percent vote in Baramati for Vidhan sabha 2019