Pune Rains : पूरबळींची संख्या पोचली २४ वर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

अतिवृष्टीत पुणे शहर आणि जिल्ह्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या शुक्रवारी २४ वर गेली आहे. शोधकार्यात आज चौघांचे मृतदेह सापडले. मात्र, अजूनही पाच ते सहा जण बेपत्ता आहेत. पीएमआरडीए व महापालिका अग्निशामक दल, स्थानिक पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. 

पुणे/ खेड-शिवापूर - अतिवृष्टीत पुणे शहर आणि जिल्ह्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या शुक्रवारी २४ वर गेली आहे. शोधकार्यात आज चौघांचे मृतदेह सापडले. मात्र, अजूनही पाच ते सहा जण बेपत्ता आहेत. पीएमआरडीए व महापालिका अग्निशामक दल, स्थानिक पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. 

कोळेवाडीतील नाल्यावरून वाहून गेलेल्या मोटारीतील एक, तर नऱ्हे येथून वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह आज सापडला. सूरज ऊर्फ बाबू संदीप वाडकर व मुकेश हरिदास गाडीलोहार अशी दोघांची नावे आहेत, तर खेड-शिवापूर (ता. हवेली) येथील ओढ्याच्या पुरात वाहून गेलेल्या आरती श्‍याम सूर्यवंशी आणि सुवर्णा रामचंद्र जाधव यांचे मृतदेह खेड-शिवापूर येथील बंधाऱ्यात आढळले.

वाडकर हे त्यांचे मित्र निखिल दिनेश चव्हाण, साईनाथ ऊर्फ गणेश तुकाराम शिंदे यांच्यासमवेत मोटारीतून कोळेवाडीतील नाल्यावरील पुलावरून जात होते. पाण्याचा जोरदार प्रवाह असल्यामुळे गावकऱ्यांनी खबरदारी  म्हणून पुलावर दुचाकी लावून रस्ता बंद केला होता. हे तिघेजण मोटारीतून जात असताना गावकऱ्यांनी त्यांना रोखले. मात्र, त्यांनी दुचाकी बाजूला काढून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पाण्याच्या जोरदार प्रवाहामध्ये तिघेही मोटारीसह वाहून गेले. स्थानिकांनी शोध घेतला असता जांभूळवाडी तलावामध्ये वाडकर यांचा मृतदेह आढळला. अग्निशामक दलाने मृतदेह बाहेर काढला. उर्वरित दोघांचा शोध घेण्याचे काम उद्याही सुरू ठेवले जाणार आहे. वानवडी येथील साळुंखे विहार परिसरातून सलीम शेख व व्हिक्‍टर ऑगस्टीन सांगळे हे बुधवारी (ता. २५) मध्यरात्री वाहून गेले आहेत. पोलिस, अग्निशामक दलाचे जवान त्यांचा शोध घेत आहेत. 

नऱ्हे येथे भिंत कोसळल्यानंतर आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामध्ये वाहून गेलेले गाडीलोहार यांचा मृतदेह आज दुपारी सव्वादोन वाजता पीएमआरडीएच्या अग्निशामक दलास आढळला. घटनास्थळापासून सात ते आठ किलोमीटरवर मृतदेह सापडल्याचे अधिकारी विजय महाजन यांनी सांगितले. 

खेड-शिवापूरच्या बंधाऱ्यात दोघींचे मृतदेह
खेड-शिवापूर येथील ओढ्याला बुधवारी आलेल्या पुरात सहा जण वाहून गेले होते, त्यातील चौघांचे मृतदेह गुरुवारी (ता. २६) सापडले होते, तर श्‍याम आणि आरती सूर्यवंशी यांचा शोध ‘एनडीआरएफ’च्या पथकाकडून सुरू होता. हा शोध सुरू असताना बंधाऱ्यात सुवर्णा यांचा मृतदेह सापडला, तर सायंकाळी सातच्या सुमारास त्याच बंधाऱ्याच्या पुढे काही अंतरावर आरती यांचा मृतदेह आढळला. विशेष म्हणजे पोलिस आणि प्रशासनाकडे सुवर्णा बेपत्ता असल्याची नोंद नव्हती, त्यामुळे ज्यांची बेपत्ता असल्याची नोंद नाही, असे अनेक जण या पुरात वाहून गेल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twenty four Flood victims