पुण्यात सोशल मीडियाच्या मदतीने पुरग्रस्तांसाठी 22 ट्रक साहित्य जमा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

सामाजिक जाणिवेची जबाबदारी असलेल्या युवकांच्या एका गटाने सोशल मीडियाची मदत घेऊन अवघ्या एका दिवसात सांगली, कोल्हापूरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी २२ ट्रक साहित्य जमा केले.  

पुणे - सामाजिक जाणिवेची जबाबदारी असलेल्या युवकांच्या एका गटाने सोशल मीडियाची मदत घेऊन अवघ्या एका दिवसात सांगली, कोल्हापूरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी २२ ट्रक साहित्य जमा केले.     
‘पुणे जागृती ग्रुप’ व ‘चांगुलपणाची चळवळ’तर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. बिस्कीटचे बॉक्‍स, पिण्याचे पाणी, साखर, तेल, बॅटरी, मेणबत्त्या, माचीस बॉक्‍स, टूथब्रश, पेस्ट, साबण, ब्लॅंकेट, शाल, बेडशीट, मच्छरदाणी, मच्छर कॉईल, चिवडा, विविध औषधे, सॅनिटरी नॅपकिन आदी वस्तूंचे या युवकांनी संकलन केले. जागृती ग्रुपतर्फे गेल्या दहा वर्षांपासून दुष्काळग्रस्तांसाठी मदत गोळा केली जाते. 

यंदा पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करण्याचे संघटनेने ठरविले. रघुनाथ येमूल गुरुजी यांच्या प्रेरणेतून हे संकलन केल्याचे संघटनेचे अध्यक्ष राज देशमुख यांनी सांगितले. सांगली, कोल्हापूरमधील प्रशासकीय यंत्रणेच्या मदतीने या साहित्याचे वाटप केले. डॉ. उमाकांत खेडेकर, मनीषा वाघमारे, सचिन कदम, विजय दरेकर, ऋषिकेश गायकवाड, ज्योती महाडिक, दीपाली सनपूरकर, कपिल पाटील, दिलीप शेलवंटे यांच्यासह ३५० कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. फर्ग्युसनमध्ये ११ ऑगस्ट रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ दरम्यान वस्तूंचे संकलन करण्याचे ठरविले. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा उपक्रम ‘व्हायरल’ केला अन्‌ विक्रमी प्रतिसाद लाभला, असे राज देशमुख यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twenty-two truck materials have been collected for the victims with the help of social media in Pune