एटीएम फोडणाऱ्या दोघांना अटक; नारायणगाव पोलिसांची कामगिरी

रवींद्र पाटे
Thursday, 31 December 2020

पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नारायणगाव शाखेचे एटीएम फोडत असताना नगर जिल्ह्यातील दोन सराईत चोरट्यांना रात्र गस्तीवर असलेल्या नारायणगाव पोलिसांनी आज पहाटे अटक केली.

नारायणगाव : पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नारायणगाव शाखेचे एटीएम फोडत असताना नगर जिल्ह्यातील दोन सराईत चोरट्यांना रात्र गस्तीवर असलेल्या नारायणगाव पोलिसांनी आज पहाटे अटक केली. पोलिसांच्या या कामगिरीचे नारायणगाव ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

या प्रकरणी राहूल वसंत सुपेकर (मूळ रहाणार निघोज पठारवाडी ता. पारनेर, जि. नगर सध्या रा. रांजणगाव एमआयडीसी, ता. शिरूर), बाजीराव बाळासाहेब नागरगोजे (मुळ रा. चिंचपुर ता. पाथर्डी, जि. नगर सध्या रा रांजणगाव एमआयडीसी. ता. शिरूर) यांना अटक केली आहे.

या बाबत नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. के. गुंड म्हणाले, ''नोव्हेंबर महिन्यात मंचर येथे एटीएम मशीन पळवून नेण्याची घटना घडली होती. त्यानंतर पाच डिसेंबर रोजी पहाटे अडीच वाजण्याचा सुमारास  येथील महामार्गालगत असलेल्या आयडीबीआय बँकेचे एटीएम गँसकटरच्या साहाय्याने फोडण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमूळे फसला होता.

मात्र या वेळी चोरटे पसार झाले होते. एटीएम व बंद सदनिका चोरीच्या घटना जिल्ह्यात वाढल्या आहेत. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी नवीन वर्षाच्या सुरवातीला रात्र गस्तीवर असताना अधिक दक्ष राहण्याच्या व एटीएमकडे लक्ष देण्याची सूचना केली होती. नारायणगाव पोलीस स्टेशनचे रात्रगस्त पथक आज पहाटे पहाणी करत असताना येथिल महामार्गालगत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेचे एटीएमचे लोखंडी शटर अर्धवट उघडे असल्याचे दिसले.

जाणून घ्या केसरचे फायदे; हाडांची मजबूती, कँसरशी लढा आणि उत्तम सेक्स लाईफ देतो केसर  

या वेळी पथकातील पोलिस कर्मचारी ठोबळे व पठाण यांनी शटर बंद करण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी ठोबळे यांच्या हातावर लोखंडी टॉमी मारली. मात्र प्रसंगावधान राखून ठोबळे यांनी शटर बंद केले. काही वेळातच मदतीसाठी इतर पोलीस व पोलीस मित्र घटनास्थळी दाखल झाले. त्या नंतर एटीएमचे 
शटर उघडून पोलिसांनी राहूल सुपेकर,बाजीराव नागरगोजे यांना अटक केली.

आरोपींकडून एटीएम फोडण्यासाठी असलेले लोखंडी सहित्य जप्त केले. पोलीस अधिक्षक देशमुख, अपर पोलीस अधिक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोलीस कर्मचारी ठोबळे,पठाण, हिंगे, दिनेश साबळे, लोंढे, शेख, काळूराम साबळे, दुपारगुडे, सचिन कोबल, अरगडे, लोहोटे, जायभाये, वाघमारे, पोलीस मित्र भरत मुठे, ईश्वर पाटे, ऋषिकेश कुंभार यांनी ही कामगिरी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात एटीएम फोडण्याच्या घटना झाल्या होत्या. या आरोपींकडून इतरही चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे: -सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. के. गुंड 

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two arrested for ATM burglary in narayangaon