
पिंपरीत रेमडेसीव्हीर इंजेक्शन काळ्या बाजाराने विकणारे दोघे अटकेत
पिंपरी : कोरोना उपचारावरील रेमडेसीव्हीर इंजेक्शन काळ्या बाजाराने विकणाऱ्या दोघांना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली आहे. आरोपींमध्ये एका नर्सचा समावेश असून तिच्यावरही गुन्हा दाखल आहे. राहुल कल्याण बोहाळ (वय २८), विजय गणेश शिरसाठ (वय २९, दोघेही रा. विजयनगर, काळेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे असून नर्स ज्योती कोकणे-लगड हिच्यावर गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी , एक महिला काळ्या बाजाराने रेमडेसीव्हीर इंजेक्शन विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस व अन्न-औषध प्रशासनाच्या पथकाने बनावट ग्राहक तयार करून ज्योती हिच्या मोबाईलवर संपर्क साधला.
हेही वाचा: 'मोक्का' लागलेल्या दिप्ती काळेची ससूनच्या 8 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या
त्यानंतर काही वेळातच आरोपी राहुल व विजय यांनी ग्राहकाच्या मोबाईलवर संपर्क साधून इंजेक्शन उपलब्ध असल्याचे सांगून एकाची किंमत चाळीस हजार याप्रमाणे दोन इंजेक्शनची ऐंशी हजार रुपये सांगितले. हे इंजेक्शन हवे असल्यास विजयनगर येथील क्रांती चौकात येणार असल्याचेही सांगितले. त्यानुसार सोमवारी (ता. २६) रात्री सव्वा आठच्या सुमारास सापळा रचून राहुल व विजय यांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून दोन इंजेक्शन ताब्यात घेतले. हे इंजेक्शन कुठून आणले याबाबत विचारले असता पिंपरीतील नेहरूनगर येथील संतोषी माता चौकातील आयुष रुग्णालयात नर्स म्हणून कामाला असलेल्या ज्योती कोकणे-लगड हिच्याकडून आणल्याचे आरोपींनी सांगितले. त्यांच्याकडून दोन इंजेक्शनसह एक दुचाकी जप्त केली. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Web Title: Two Arrested In Pimpri Chinchwad Black Marketing
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..