Video : जम्बो कोविंड सेंटरमधून बेपत्ता झाली लेक; आईनं सुरू केलं बेमुदत उपोषण!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 September 2020

माझी मुलगी परत मिळाल्याशिवाय मी हे उपोषण सोडणार नाही. माझी मुलगी मला जीवंतच मिळाली पाहिजे. ससून रूग्णालयातून अँब्युलन्समधून कोविड सेंटरमध्ये माझी मुलगी दाखल झाली होती. दरम्यानच्या काळात तिच्यावर उपचार सुरू असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले.

पुणे : कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या आपल्या 33 वर्षीय लेकीला त्या माऊलीने जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल केले. ससून रूग्णालयातून याठिकाणी दाखल झालेल्या या रूग्ण महिलेवर उपचार सुरू असल्याचे कोविड सेंटरतर्फे सुरूवातीला सांगण्यात आले. मात्र, बरी झालेल्या आपल्या लेकीला जम्बो कोविड सेंटरमधून घरी घेऊन जाण्यासाठी गेलेल्या मातेला, 'तुमची मुलगी येथे अॅडमिटच नव्हती', अशी धक्कादायक माहिती देण्यात आल्याने त्या माऊलीने आता बेमुदत उपोषणाचा मार्ग निवडला आहे. 

पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांनो, आता रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरू ठेवता येणार!​

जम्बो कोविड सेंटर येथून बेपत्ता झालेल्या प्रिया गायकवाड या ३३ वर्षीय महिलेचा घातपात झाला असण्याची शक्यता व्यक्त करत बेपत्ता महिलेच्या आई रागिणी सुरेंद्र गमरे यांनी जम्बो कोविड सेंटर येथे बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे. या उपोषण आंदोलनाचे आयोजन रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले असून यावेळी रिपब्लिकन युवा मोर्चाचे पक्ष नेते राहुल डंबाळे हे देखील उपोषणाला बसले आहेत.

तुम्ही लवकर बरे व्हाल, कोरोना बाधित पोलिसांशी नवनियुक्त पोलिस आयुक्तांनी साधला ऑनलाइन संवाद​

यावेळी बोलताना प्रिया गायकवाड यांच्या आई रागिणी सुरेंद्र गमरे म्हणाल्या की, ''माझी मुलगी परत मिळाल्याशिवाय मी हे उपोषण सोडणार नाही. माझी मुलगी मला जीवंतच मिळाली पाहिजे. ससून रूग्णालयातून अँब्युलन्समधून कोविड सेंटरमध्ये माझी मुलगी दाखल झाली होती. दरम्यानच्या काळात तिच्यावर उपचार सुरू असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले. आता मुलीला घरी परत नेण्याची वेळ आली, तेव्हा ती कोविड सेंटरमध्ये नसल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात संबंधित सर्व यंत्रणा हात वर करून मोकळ्या झाल्या आहेत. मला माझी मुलगी पाहिजे आहे आणि मला न्याय पाहिजे आहे.''

 विमाननगर कोविड केअर सेंटरमध्ये दोन महिन्यात सात हजार रुग्ण झाले बरे​

यावेळी बोलताना राहुल डंबाळे म्हणाले की, ''करोडो रूपये खर्च करून आणि ठिकठिकाणी सीसीटिव्ही लावून उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरचा कारभार फारच संतापजनक आहे. अशा प्रकारे या ठिकाणाहून एखादी व्यक्ती बेपत्ता होते, हा यंत्रणेतील दोष असून संबंधित प्रशासकीय यंत्रणेवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच पालकमंत्री, आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री या सगळ्यांनी या प्रकारात लक्ष घालून या माऊलीला न्याय द्यावा, अशी आमची मागणी आहे. याप्रकरणी प्रशासकीय यंत्रणेने अद्याप मौन सोडलेले नाही. या प्रकरणाचा त्यांनी कोणताही खुलासा केलेला नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mother of Priya Gaikwad who missing from Jumbo Covid Center has started agitation