दोन लेकरांची आई झाली बारावी उत्तीर्ण

संतोष शेंडकर
गुरुवार, 31 मे 2018

परिसरातील पारधी समाजात बारावीपर्यंत शिकलेली ती दुसरीच मुलगी आहे. दोन मुले आणि घर सांभाळून तिला बारावीला 56 टक्के गुण मिळाले आहेत. विशेष म्हणजे सातवीतून शाळा सोडल्यावर लग्न झाले आणि पुन्हा आठ-नऊ वर्षांनी ती शिक्षणाच्या प्रवाहात आली सारिका सोमेश्वर विद्यालयाच्या करंजे भागशाळेत शिकत होती.

सोमेश्वरनगर - सातवीतनं शाळा सोडली होती. पण कळायला लागल्यावर शिकायला पाहिजे. आई-वडिलांची इच्छा होती. पती आजिबात शिकलेले नव्हते. परंतु, ते शिकवण्यासाठी तयार होते. म्हणून आधी दहावी केली आणि आता बारावी पास झाले. आधी लोक म्हणायचे, दोन पोरांची आई आहे, तरी शिकायचे सोंग करतेय. परंतु, आज कौतुक करत आहेत. आता पोलिस होणार आहे. असे सोमेश्वर देवस्थान (ता. बारामती) येथे राहणाऱ्या पारधी समाजाच्या सारिका राजेंद्र काळे हिने बारावीची परिक्षा पास झाल्यावर दैनिक सकाळकडे वरील शब्दात भावना व्यक्त केल्या. 

परिसरातील पारधी समाजात बारावीपर्यंत शिकलेली ती दुसरीच मुलगी आहे. दोन मुले आणि घर सांभाळून तिला बारावीला 56 टक्के गुण मिळाले आहेत. विशेष म्हणजे सातवीतून शाळा सोडल्यावर लग्न झाले आणि पुन्हा आठ-नऊ वर्षांनी ती शिक्षणाच्या प्रवाहात आली सारिका सोमेश्वर विद्यालयाच्या करंजे भागशाळेत शिकत होती. परंतु कमालीचे दारिद्रय, शिक्षणाची परंपरा नाही आणि शिक्षणव्यवस्था सामावून घेण्यात अपयशी ठरल्याने ती प्रवाहाबाहेर फेकली गेली. 

सारिकाची आई बारीक व वडील राजेंद्र यांची चारही मुले शिकविण्याची इच्छा होती परंतु आर्थिकदृष्ट्या त्यांनी ते पेलवणारे नव्हते. यानंतर 2006 मध्ये तिचे बालवयातच निंबुत येथील घुंगरू भोसले यांच्याशी विवाह झाला. दोन मुलेही झाली. दोघांनी मिळून जागा घेऊन घरही बांधले. दरम्यान राजेंद्र यांचे 2014 मध्ये सारिकाच्या डोळ्यासमोर अपघाती निधन झाले. बापाच्या स्वप्नाखातर सारिकाची धाकटी बहीण संगीताने बारावी केली, व्यायाम केला आणि 2015 मध्ये पोलिसात भरती झाली. सारिकाला यातून प्रेरणा मिळाली. तिने सतरा क्रमांकाचा अर्ज भरून थेट दहावीची परीक्षा दिली. सहा महिने अभ्यास करून 56 टक्के मिळवून ती उत्तीर्ण झाली. यानंतर पती घुंगरू व आई बारीक यांनी मुलांच्या जबाबदारीत मदत केल्याने सारिकाला मु. सा. काकडे महाविद्यालयात अकरावी, बारावी नियमित करता आले. दररोज दहा-बारा किलोमीटर सायकल चालवून तिने हे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयातील शिक्षकांनी तिच्यावर अधिकचे लक्ष दिले. रजनीकांत गायकवाड, निकीता गायकवाड यांनी तिला स्वच्छेने वेळ मिळेल असे शिकविले. यामुळे सारिका पुन्हा 56.92 टक्के घेऊन बारावी उत्तीर्ण झाली आहे. तिने मराठी या विषयात चक्क 81 गुण मिळविले आहेत. सोबत तिने माळावर धावणे, उंच उडी-लांब उडी मारणे याचा व्यायामही सुरू केला आहे. तिचा मुलगा समाधान पाचवीला तर वैष्णव दुसरीत आहे.

Web Title: two childrens mother pass 12th examination