पिंपरीत उच्चशिक्षितांना दोन कोटींना ठकवले

पिंपरीत उच्चशिक्षितांना दोन कोटींना ठकवले

पिंपरी - तुमच्याकडे स्मार्ट फोन आहे आणि तुम्ही ऑनलाइन व्यवहारही करता? तसेच तुम्हाला नोकरी, बक्षीस, गुंतवणुकीतून मोठा परतावा देण्याबाबत एसएमएस आला आहे. तर, सावध व्हा. कारण, तुमची फसवणूक होऊ शकते. गेल्या महिनाभरात शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत असे सतरा गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातून तब्बल एक कोटी ७३ लाख ७७ हजार ८७५ रुपयांची फसवणूक झाली आहे. ठकवलेले बहुतांश उच्चशिक्षित आहेत.

आम्ही गृह, वाहन आणि व्यक्तिगत कर्ज देतो, असे आमिष दाखवून कय्यूम दादापीर रामदुर्ग (वय ४६, रा. कासारवाडी) यांची दोन लाख २४ हजार ३५० रुपयांची फसवणूक झाली. त्यांना कर्ज मंजूर झाल्याचा इमेल आला. त्यांना फाइल चार्ज, ॲग्रिमेंट चार्जच्या नावाखाली फसविले. तर, ऑनलाइन नोकरी शोधणारे असीम पाल यांना अनोळखी क्रमांकावरून फोन आला. मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून रजिस्ट्रेशन व वेगवेगळ्या खर्चापोटी ऑनलाइन एक लाख ३५ हजार ४१२ रुपये घेतले. रामराव झांबरे (वय ८६, रा. दिघी) यांच्या फिर्यादीनुसार नातेवाईक विशाल बाळासाहेब शिंदे (रा. वाळखिंडी, ता. जत, जि. सांगली) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे. त्याने झांबरे यांच्या घरातील टेबलावरील एटीएम कार्ड चोरून ५० हजार रुपये काढले व फसवणूक केली. 

फसवणूक झालेल्या व्यक्‍तीचे नाव प्रसारमाध्यमांद्वारे अनेकांना कळते. त्यामुळे बदनामी होत असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. 

अशी करा तक्रार
ऑनलाइन फसवणूक झाल्यास सायबर विभागाकडे लेखी तक्रार करा. त्यासोबत मोबाईलवरील मेसेजची प्रिंट व शक्‍य असल्यास बॅंक स्टेटमेंट जोडा. त्यानुसार तपास सुरू होतो. पैसे वर्ग झालेल्या खात्याची माहिती घेतली जाते. त्या खातेदाराची केवायसीबाबत माहिती घेतली जाते. एटीएममधून पैसे काढले असल्यास सीसीटीव्ही फुटेज बघितले जाते. ५० हजारांच्या आतील गुन्हे पोलिस ठाण्याकडे वर्ग केले जातात. त्यावरील रकमेच्या गुन्ह्याचा तपास सायबरचे अधिकारी करतात, असे पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com