खेड तालुक्यात दोन दिवस जनता कर्फ्यू 

राजेंद्र सांडभोर
Wednesday, 16 September 2020

या दोन्ही दिवशी तालुक्यातील राजगुरूनगर, चाकण आणि आळंदी या तीन गावांमध्ये आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन प्राथमिक चाचण्या घेऊन कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्ती शोधणार आहेत.

राजगुरुनगर (पुणे) : खेड तालुक्यात १८ आणि १९ सप्टेंबर रोजी जनता कर्फ्यू पाळून तालुका बंद ठेवण्याचे आवाहन आमदार दिलीप मोहिते यांनी केले आहे. या दोन्ही दिवशी तालुक्यातील राजगुरूनगर, चाकण आणि आळंदी या तीन गावांमध्ये आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन प्राथमिक चाचण्या घेऊन कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्ती शोधणार आहेत. त्यामुळे या तीन गावांतील वैद्यकीय व शासकीय आस्थापना वगळता सर्व व्यवहार बंद राहतील, असा आदेश उपविभागीय अधिकारी संजय तेली यांनी काढला आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

खेड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे सरकारच्या 'माझे कुटुंब- माझी जबाबदारी' या मोहिमेअंतर्गत घरोघरी प्राथमिक चाचण्यांद्वारे, कोरोना लक्षणे असलेल्या व्यक्ती शोधून, त्यांच्या प्रत्यक्ष चाचण्या घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी १६ व १७ सप्टेंबर रोजी कोरोना तपासण्या होणार होत्या. बैलपोळ्यामुळे त्या तारखा बदलून १८ व १९ सप्टेंबर रोजी करण्यात आल्या आहेत. त्यासाठी तालुक्यात २५० पथके तयार करण्यात आली आहेत. लोकांनी अधिकचा संसर्ग टाळण्यासाठी आपल्या कुटुंबातील आजारी व्यक्तीविषयीची खरी माहिती आरोग्य कर्मचार्‍यांना द्यावी, असे आवाहन मोहिते यांनी केले आहे.  

यंदा अधिक मासावरही कोरोनाचे संकट, जावईबापूंचा हिरमोड

आरोग्य कर्मचारी पल्स ऑक्सीमिटरद्वारे लोकांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासणार आहेत. त्यांत ज्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण ९५ पेक्षा कमी असेल, त्यांची आणि ज्यांना कोरोनासदृश लक्षणे आहेत, अशांची 'रॅपिड अँटिजेन टेस्ट' लगेच करण्यात येणार आहे. ती पॉझिटीव्ह आल्यास त्यांना रुग्णालयात दाखल केले जाईल. ज्या गावांमध्ये कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण जास्त आहेत, ती गावे प्राधान्याने या उपक्रमात घेण्यात येणार आहेत.
- बी. बी. गाढवे, तालुका आरोग्य अधिकारी, खेड  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two days public curfew in Khed taluka