कंटेनरच्या धडकेने दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

कोरेगाव भीमा - पेरणेफाटा (ता. हवेली) चौकात कंटेनरची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीस्वारासह महिला मृत्युमुखी पडली. पुणे- नगर रस्त्यावर सकाळी साडेअकराच्या सुमारास झालेल्या या अपघातात रामदास किसन तनपुरे (वय ६५) व सिंधूबाई गायकवाड (वय ५५, दोघे रा. डोंगरगाव, ता. हवेली) या दोघांचा मृत्यू झाला.

लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेरणेफाटा (ता. हवेली) चौकात सिंधूबाई भाजी घेण्यासाठी आल्या होत्या. भाजी घेतल्यानंतर त्या डोंगरगावचेच रहिवासी असलेले रामदास तनपुरे यांच्या दुचाकीवर बसून डोंगरगावला घरी जाण्यासाठी निघाल्या. पुणे बाजूकडून नगरकडे निघालेल्या कंटेनरची दुचाकीस धडक बसली. या अपघातात जखमी होऊन दोघांचाही जागीच मृत्यू झाला. पोलिसानी दोघांनाही त्वरित दवाखान्यात हलवत वाहतूक सुरळीत केली.

शिक्रापूरला जाणारे पालकमंत्री गिरीश बापट हेही या वाहतूक कोंडीत सापडले होते. गावातील दोन व्यक्तींचा अपघाती मृत्यू झाल्याने डोंगरगाववर शोककळा पसरली.

भाजीवाले पुन्हा चर्चेत...
पेरणे चौकात मुख्य रस्त्यालगत बसणारे भाजी विक्रेते, तसेच भाजी घेण्यासाठी थांबणारे नागरिक व प्रवासी वाहने यामुळे येथे नेहमीच वाहतूक कोंडी होते. वाहनांचे नियंत्रण सुटल्यास मोठ्या अपघाताचाही धोका आहे.

मंगळवारी झालेल्या अपघातामुळे चौकातील कोंडी, रहदारी व भाजीविक्रेत्यांच्या अतिक्रमणांचा विषय पुन्हा चर्चेत आला. लोणीकंद पोलिसांनी अनेक वेळा भाजी विक्रेत्यांना समज दिली असून, प्रसंगी कडक कारवाईचा इशाराही दिला आहे.

Web Title: Two Death in Container Dash