औंधजवळ अपघातात  दोन अभियंत्यांचा मृत्‍यू

औंधजवळ अपघातात  दोन अभियंत्यांचा मृत्‍यू

पुणे - भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजक तोडून विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर गेलेल्या कारला भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरची जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील दोन संगणक अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वरित दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी मध्यरात्री दीड वाजता औंधजवळील केंद्रीय विद्यालयासमोर घडली. 

प्रतीक प्रमोद रामशेट्टीवर (वय २९, रा. चंद्रपूर) व राहुल रामचंद्र नायर (वय २८, रा. औंध, मूळ केरळ) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत, तर त्यांचे मित्र रोहित बर्मन व नीलम नेगी हे या अपघातात जखमी झाले आहेत. टेम्पो ट्रॅव्हलरचालक शिवाजी जगदाळे (वय ३५, रा. सांगवी) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिस उपनिरीक्षक एस. डी. दराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामशेट्टीवार, नायर, बर्मन व नेगी हे चौघेही संगणक अभियंते त्यांच्या मित्रांनी आयोजित केलेल्या पार्टीला गेले होते. तेथून रात्री उशिरा नायर हा त्याच्या मित्रांना शिवाजीनगर येथे सोडण्यासाठी जात होता. कार वेगात असल्याने चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार दुभाजकाला धडकून रस्त्याच्या पलीकडे जाऊन पडली. त्याचवेळी समोरून येणाऱ्या भरधाव ट्रॅव्हलरची धडक कारला बसली. या जबर धडकेमुळे कारचा समोरील भाग पूर्णपणे तुटला.  नायर व रामशेट्टीवार हे कारमध्ये पुढे बसलेले असल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तत्काळ औंधमधील रुग्णालयात हलविले. या अपघातात जगदाळे यांचा उजव्या पायाचे हाड मोडले आहे. कारमधील चौघांनीही मद्यपान केल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे. दरम्यान, या अपघातामुळे रस्‍त्‍यावर वाहतुकीची कोंडी झाली होती.

दुभाजक कमी उंचीचा
राजभवनापासून ते औंध येथील राजीव गांधी पुलापर्यंत रस्त्याच्या मध्यभागी असलेला दुभाजक नावालाच आहे. मोठ्या आकाराचा दुभाजक असता, तर या अपघातात कार रस्त्याच्या पलीकडे गेली नसती आणि दोघांना प्राण गमवावा लागला नसता, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com