अवसरी खुर्द दोन शासकीय महाविद्यालय बंद; मराठ्यांच्या आरक्षणासाठी विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन

डी. के. वळसे पाटील
शुक्रवार, 27 जुलै 2018

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन महाविद्यालय शुक्रवारी (ता. २७) बंद ठेवण्यात आले होते. तीन हजार विद्यार्थ्यांनी मराठा क्रांती मोर्चाला पाठींबा देऊन बंदमध्ये सहभाग नोंदविला.

मंचर : अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन महाविद्यालय शुक्रवारी (ता. २७) बंद ठेवण्यात आले होते. तीन हजार विद्यार्थ्यांनी मराठा क्रांती मोर्चाला पाठींबा देऊन बंदमध्ये सहभाग नोंदविला. महाविद्यालयासमोर शांतता मार्गाने धरणे आंदोलन केले.

दोन्ही महाविद्यालयातील विद्यार्थी सकाळी दहा वाजता एकत्र आले. त्यांनी प्रथम काकासाहेब शिंदे या जलसमाधी घेतलेल्या युवकाला श्रद्धांजली वाहिली. त्यांनी मराठा आरक्षण मिळाले पाहिजे. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. विद्यार्थ्यांच्या भावना तीव्र होत्या. शासनाने गेली दोन वर्ष वेळकाढूपणा केला आहे. त्यामुळे नाराज झालेला समाज रस्त्यावर उतरून न्याय हक्कासाठी आक्रमक झाला आहे. त्यांची मानसिकता संपत चालली आहे. राज्य शासनाने बघ्याची भूमिका न घेता. तत्काळ मराठा आरक्षण लागू करावे. अशी मागणी मनोगताद्वारे विद्यार्थी व विद्यार्थीनींनी केली. यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून मंचर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान शांतता मार्गाने आंदोलन केल्याबद्दल राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. सुनील बांगर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Two government colleges closed at Avsari Khurd Manchar