लोणी काळभोरमध्ये निवडणुकीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी

जनार्दन दांडगे
Wednesday, 13 January 2021

-लोणी काळभोर ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी, लोणी काळभोर गावात वातावरण तंग, दोन्ही पॅनेलच्या प्रचार संभाच्यावर पोलिसांची बंदी.

उरुळी कांचन (पुणे) : लोणी काळभोर ग्रामपंचायतीचा प्रचार अंतीम टप्प्यात आला असतानाच, निवडणुकीला गालबोट लागले. निवडणुकीच्या वादातुन महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर व शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रशांत काळभोर या दोन गटात मंगळवारी (ता. 12) मध्यरात्रीच्या समारास लोखंडी गज व लाकडी दांडक्याच्या साहय्याने तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गटातील हाणामारी सोडविण्यासाठी लोणी काळभोर पोलिसांनी लाठीचार्जही केला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, दोन्ही गटांनी दिलेल्या परस्परविरोधी तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिसांनी दोन्ही गटातील तब्बल बावीस जणांच्या विरोधात दंगलींचा गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही गटाच्या हाणामारीत दोन चारचाकी गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून, दोन्हीकडील कार्य़क्त्यांच्या गळ्यातील साडेअकरा तोळे सोन्याचे दागिणे गहाळ झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. 

या प्रकरणी महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर गटाच्या शुभम तात्यासाहेब काळभोर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी अष्टविनायक पॅनेलचे प्रमुख प्रशांत दत्तात्रय काळभोर, राज उर्फ विशाल प्रताप काळभोर, गुरूदेव दत्तात्रय काळभोर, सौरभ दयानंद काळभोर, शुभम विलास काळभोर, निखील धोंडीबा काळभोर, वैभव आनंदा काळभोर, रोहीत गिरी, निलेश धोंडीबा काळभोर, शुभम प्रदिप क्षीरसागर व सिध्देश्वर प्रदिप क्षीरसागर या अकरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर प्रशांत काळभोर गटाच्या सौरभ दयानंद काळभोर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर यांच्यासह युवराज रामचंद्र काळभोर, गणेश सुखदेव काळभोर, नितिन ज्ञानोबा काळभोर, आदित्य तुपे, किशोर मदणे, सीताराम लांडगे, सुभाष काळभोर, प्रवीण राजाराम काळभोर, अमित माणिक काळभोर, शुभम तात्यासाहेब काळभोर या अकरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

राज्याच्या वेगवेगळ्या भागात लशीसाठी शीतगृहे सज्ज

लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या सतरा सदस्यांसाठी पंचवार्षिक निवडणुक येत्या शुक्रवारी (ता. 15) होणार आहे. या निवडणुकीसाठी यशवंत सहकारी साखऱ कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, माजी जिल्हा परीषद सदस्य विलास काळभोर, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर व हवेली तालुका कॉग्रेसचे (आय) चे माजी अध्यक्ष शिवदास काळभोर यांच्या नेतृत्वाखालील परीवर्तन पॅनेल व शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रशांत काळभोर व लोणी काळभोरचे माजी सरपंच शऱद काळभोर यांच्या नेतृत्वाखालील अष्टविनायक पॅनेल या दोन पॅनेलमध्ये सरळ लढत आहे. दोन्ही गटांनी निवडणुक जिंकण्यासाठी साम, दाम, दंड व भेद या नितीचा वापर सुरु केला आहे. यातूनच मंगळवारी वारी लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील पाषानकर बागेत भांडणाचा भडका उडाला. महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर यांचे पाषानकर बागेत जनसंपर्क कार्यालय असून, या कार्यालयावर प्रशांत काळभोर यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याने वरील प्रकार झाल्याचा आरोप राहुल काळभोर गटाने केला आहे. 

दोन्ही पॅनेलच्या प्रचारसभा रद्द करण्याचे आदेश- बंडगर याबाबत अधिक बोलताना लोणी काळभोरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बंडगर म्हणाले, ''माधव काळभोर यांच्या नेतृत्वाखालील परीवर्तन पॅनेल व प्रशांत काळभोर यांच्या नेतृत्वाखाली अष्टविनायक पॅनेल या दोन्ही  पॅनेलच्या कार्यकर्त्यात मंगळवारी रात्री उशीरा हाणामारी झालेली आहे. या प्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या परस्परविरोधी तक्रारीनुसार, दोन्ही गटातील तब्बल बावीस जणांच्या विरोधात दंगलींचा गुन्हा दाखल केला आहे.

हाणामारीचे सिसीटिव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलेले आहे. यामुळे भांडणे नेमकी कोणी सुरु केली याचा तपास चालू आहे. रात्रीच्या प्रकारामुळे वातावरण चिघळू नये यासाठी पोलिसांनी दोन्ही गटांच्या प्रचार सभांना परवानगी नाकारली आहे. गावात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, यापुढील काळात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी पोलिसांना गडबड करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सुचनाही दिलेल्या आहेत. 

पुणे जिल्ह्यातील यंत्रणा लसीकरणासाठी सज्ज

पोलिसांचे संचलन- लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत मंगळवारी रात्री घडलेल्या दोन गटातील राड्याच्या प्रार्श्वभुमीवर लोणी काळभोर पोलिसांनी लोणी काळभोर गाव व उरुळी कांचन कांचन शहरात संचलन केले. 

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two groups fight in loni kalabhor