अंधार्‍या रात्री ते दोन घरात घुसले अन्...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जुलै 2020

शहरात घरफोडीच्या दोन घटना उघड
आठ लाख 82 हजार रुपयांच्या वस्तू चोरीला

पुणे : शहरात दोन ठिकाणी घडलेल्या चोरीच्या घटना शुक्रवारी उघडकीस आल्या आहेत. या दोन्ही चोऱ्यांमध्ये एकूण आठ लाख 82 हजार रुपयांच्या वस्तू चोरीला गेल्या आहेत. तर एका सराईत महिलेला अटक करण्यात आली आहे. 

पुण्यात या ठिकाणी रुग्णांना मिळतोय दिलासा

पहिल्या घटनेत मार्केटयार्ड परिसरात साडेसात लाखांची घरफोडी करण्यात आली. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांत गुन्हा दाखल झाला. फिर्यादी प्रकाश अंकूर अष्टेकर (वय 52, रा. विद्यासागर कॉलनी) यांची सदनिका बंद असताना चोरटे कुलूप तोडून आत घुसले. त्यानंतर घरातील 105 ग्रॅम सोन्याचे दागिने, सहा किलो चांदीचे दागिने व इतर वस्तू असा सात लाख 42 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. 

दुसऱ्या घटनेत घराचे कुलूप तोडून एक लाख 40 हजारांचे सोन्याचे दागिने चोरण्यात आले. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. फिर्यादी आसीम पिरजादे (वय 31, रा. वडगाव शेरी) यांचे राहाते घर बंद असताना 26 ते 30 जुलैदरम्यान चोरट्याने घरफोडी केली. यामध्ये 34 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरले. 

वीजग्राहकांना लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता

सोने खरेदीच्या बहाण्याने चोरी : 
सोने खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानातून एक लाख 10 हजारांचे सोने चोरणाऱ्या सराईत महिलेला गुन्हे शाखेने अटक केली. चोरीचे सोने तिच्याकडून जप्त केले आहे. यापूर्वी तिच्याविरुद्ध 12 गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना बिबवेवाडीत सराफा दुकानातून चोरी करणारी सराईत महिला साठेनगरमध्ये राहात असल्याची माहिती पोलिस नाईक उत्तम तारू व मितेश चोरमोले यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. चौकशीत तिने 1 लाख 10 हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी केल्याची कबुली दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two incidents of burglary revealed in the city