esakal | जुन्नरमध्ये आगीच्या दोन घटना : इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे मोठे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नरमध्ये आगीच्या दोन घटना : इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे मोठे नुकसान

जुन्नरमध्ये आगीच्या दोन घटना : इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे मोठे नुकसान

sakal_logo
By
दत्ता म्हस्कर ः सकाळ वृत्तसेवा

जुन्नर : (दत्ता म्हसकर) जुन्नर शहरातील भरवस्तीत असणाऱ्या खोत इलेक्ट्रॉनीक्स व ऋषी शूज हाऊस या दोन दुकानांचे सोमवारी ता. १३ रोजी रात्री लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही दुकाने बंद करून मालक घरी गेल्यानंतर आगीच्या घटना घडल्या.

बोडकेनगर येथील खोत इलेक्ट्रॉनीक्स या इलेक्ट्रीक दुचाकी व इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या दुकानाला रात्री आठच्या सुमारास आग लागली. यावेळी जुन्नर नगर पालिका व श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाचे बंब त्वरित घटनास्थळी आले.सदरहु दुकान पत्राशेड मध्ये असल्याने आगीमुळे पत्रे गरम झाल्याने दुकान उडघता आले नाही यामुळे दुकानात आग मोठ्या प्रमाणावर पसरली. जेसीबीच्या सहाय्याने शेडचे पत्रे तोडण्यात आलेनंतर आग विझविणे सोयीचे झाले.आगीत दुकानातील जॉय कंपनीच्या सतरा इलेक्ट्रीक दुचाकी व एलईडी टीव्ही, रेफ्रिजरेटर , वॉशिंग मशीन, एसी युनिट व दुकानातील फर्नीचर जळुन खाक झाले. आगीत दीड कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. इलेक्ट्रीक गाडीच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने ही आग लागली असण्याची शक्यता मालक हेमंत खोत यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: कुरकुरीत-चुरचुरीत : गुळाची ‘तिखट’ कथा

यावेळी जुन्नर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष धनराज खोत, नगराध्यक्ष शाम पांडे, नगरसेवक सुनिल ढोबळे, नरेंद्र तांबोळी, अंबर परदेशी, सुमीत परदेशी, अभि आहेर, राहुल परदेशी, कन्हैयाशेठ खोत,संदेश बारवे, सचिन गिरी, प्रतिक मुर्तडक, गोटु परदेशी तसेच बोडके नगर गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते यांनी आग विझविण्यासाठी मदत केली.

सराई पेठेत भरवस्तीत असणाऱ्या ऋषी शूज हाऊस या दुकानास देखील या दरम्यान आग लागली या आगीत विविध कंपन्यांचे बूट,चप्पल,सॅंडल तसेच फर्निचर जळून सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले असल्याचे मालक ऋषिकेश शिंदे यांनी सांगितले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही मात्र परिसरातील तरुणांनी आग लागल्याचे दिसताच शिंदे यांना कळविले. शटर उघडून आग विझवली.

loading image
go to top