Video : पुण्यात ब्रिटिशकालीन पुलावरून नदीत कोसळली कार; दोन बेपत्ता

सकाल वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

महाविद्यालयातून माघारी घरी जाणाऱ्या विद्यार्थ्याची स्विफ्ट कार येथील ब्रिटिशकालीन पुलावरून नदी पात्रात पडली. त्यातील एक जण बाहेर आला असून दोन विद्यार्थी बेपत्ता आहे. एनडीआरपीच्या जवानांसह स्थानिक कार्यकर्ते, पोलिस प्रशासन त्यांचा शोध घेत आहे. उशीरापर्यंत शोध मोहीम सुरू होती. पाण्यात पडलेली लेकरं न सापडल्याने आई वडीलांनी हंबरडा फोडला होता.

टाकवे बुद्रुक : महाविद्यालयातून माघारी घरी जाणाऱ्या विद्यार्थीची स्विफ्ट कार येथील ब्रिटिशकालीन पुलावरून नदी पात्रात पडली. त्यातील एक जण बाहेर आला असून दोन विद्यार्थी बेपत्ता आहे. एनडीआरपीच्या जवानांसह स्थानिक कार्यकर्ते, पोलिस प्रशासन त्यांचा शोध घेत आहे. उशीरापर्यंत शोध मोहीम सुरू होती. पाण्यात पडलेली लेकरं न सापडल्याने आई वडीलांनी हंबरडा फोडला होता.

संकेत नंदकुमार असवले( वय 20 ),अक्षय मनोहर जगताप(वय20)हे दोघे वडगावच्या हरकचंद रायचंद बाफना महाविद्यालयात बी.काॅमच्या तिसऱ्या वर्गात शिकत आहे, तर अक्षय संजय ढगे (वय 18) हा तळेगावच्या इंद्रायणी महाविद्यालयात एफ.वाय.बी.ए शिकत आहे. हे तिघेही मित्र महाविद्यालयातून माघारी जात असताना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास येथील ब्रिटीश कालीन पुलावर स्विफ्ट कारने आले. तीव्र उतारावरून वेगात येणाऱ्या कारने रस्त्यावरील खड्डा चुकविण्यासाठी प्रयत्न केला, यात चालक असवले यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि पुलाच्या डावीकडील लोखंडी कठडे तोडून कार पाण्यात पडली. त्यातील अक्षय ढगे पाण्यात पडला व बाहेर आला पण, संकेत असवले व अक्षय जगताप हे कारसह पाण्यात पडले, हे दोघे बेपत्ता असून त्याचा शोध एनडीआरपीच्या मदतीने सुरू आहे. 

कार पाण्यात पडल्याची घटना पाहताच क्षणी मागून येणाऱ्या स्थानिक तरूणांना सह बाळासाहेब कडू, संदीप आम्ले,गोरख काटकर, साहेबराव कडू स्थानिक तरुणांनी पाण्यात उड्या टाकून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही. लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र रेस्क्यू पथकाने देखील प्रयत्न केले. 

मावळचे तहसीलदार रणजित देसाई, पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर, उपनिरीक्षक नितीन नम यांनी घटनास्थळी भेट देऊन मदत कार्यासाठी प्रयत्न केले. वडगाव पोलीसांनी बंदोबस्त ठेवला, दुपारी दीड वाजल्यापासून वाहतुक बंद ठेवल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.कारखान्यात जाणाऱ्या येणाऱ्या कामगारांनी पायपीट करीत रेल्वे स्थानक गाठले. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या घटनेची परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दोघांच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडल्याने उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पाणावलेल्या. 
सहाय्यक निरीक्षक संतोष वार॔गुले यांच्या पथकाने परिश्रम घेतले. विजय राव, ज्ञानेश्वर निचित, वैभव शेढागळे, बीपलप दास यांनी डीप ड्रायव्हिंग सेटच्या मदतीने पाण्यात जाऊन शोध घेतला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two missing due to Car Fall into a river from British bridge in Pune