
Baramati News : बारामतीत पाटबंधारे विभागाच्या दोघांना लाच घेताना पकडले
बारामती - शेतजमिनीचा वाढीव मोबदला मिळण्यासाठीचा प्रस्ताव बारामतीच्या प्रांत कार्यालयास पाठवून केलेल्या कामाचा मोबदला म्हणून अडीच लाखांची लाच मागणा-या पाटबंधारे विभागाच्या दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
संदीप गोंजारी (लघुपाटबंधारे विभाग, बारामती) व रणजित प्रकाशराव सूर्यवंशी (रा. इंदापूर) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथील एका शेतक-याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या बाबत तक्रार दाखल केली होती.
संदीप गोंजारी यांनी तडजोडीअंती अडीच लाखांच्या लाचेची मागणी केली व त्यांच्या वतीने रणजित सूर्यवंशी यांनी ही रक्कम स्विकारल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. गुरुवारी (ता. 9) रात्री उशीरा ही कारवाई केली गेली.
बारामतीतील जळोची भागातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून ही कारवाई केली गेली. पोलिस निरिक्षक श्रीराम शिंदे पुढील तपास करीत आहेत. गोंजारी व सूर्यवंशी यांना न्यायालयाने सोमवारपर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईमध्ये पोलिस निरिक्षक श्रीराम शिंदे, वीरनाथ माने, पोलिस अंमलदार सौरभ महाशब्दे, अभिजित राऊत, प्रवीण तावरे यांनी सहभाग घेतला.