लाच मागणाऱ्या दोन पोलिसांना अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

फ्लॅट खरेदी-विक्रीच्या व्यवहारासंदर्भात तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीला गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागणाऱ्या खडक पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे - फ्लॅट खरेदी-विक्रीच्या व्यवहारासंदर्भात तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीला गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागणाऱ्या खडक पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त श्रीहरी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्याविरुद्ध फ्लॅटच्या खरेदी-विक्री व्यवहारप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीला आरोपी न करण्यासाठी पोलिस नाईक उमेश दत्तात्रेय मानकर (वय 41) आणि शरद अर्जुन पवार (वय 31) यांनी त्यांच्याकडे दोन लाख रुपयांची मागणी केली. अशा आशयाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली. या तक्रारीची पडताळणी केली असता, या दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराकडे दोन लाख रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी त्यादोघांविरुद्ध भ्रष्टाचार अधिनियम कलम सात अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

पोलिस उपअधीक्षक नितीन भोयर तपास करीत आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्त अधीक्षक दिलीप बोरस्ते यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Police Arrested in Bribe Demand Crime