दुचाकीबरोबर हेल्मेट देणे बंधनकारक

अवधूत कुलकर्णी
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

पिंपरी - तुम्ही नवीन दुचाकी घेताय? तुमच्याकडे हेल्मेट नाही, तर मग थांबा. दुचाकी घेताना जर तुमच्याकडे हेल्मेट नसेल, तर संबंधित दुचाकी वितरकावर तुम्हाला हेल्मेट देणे बंधनकारक आहे.

पिंपरी - तुम्ही नवीन दुचाकी घेताय? तुमच्याकडे हेल्मेट नाही, तर मग थांबा. दुचाकी घेताना जर तुमच्याकडे हेल्मेट नसेल, तर संबंधित दुचाकी वितरकावर तुम्हाला हेल्मेट देणे बंधनकारक आहे.

दुचाकी खरेदी करणाऱ्याकडे हेल्मेट नसेल, तर त्याला दोन हेल्मेट विकत देणे वितरकावर बंधनकारक आहे. एक हेल्मेट चालकासाठी आणि दुसरे हेल्मेट दुचाकीवर चालकाच्या मागे बसण्यासाठी देणे सक्तीचे आहे. परंतु, या प्रादेशिक परिवहन विभागाने काढलेल्या या परिपत्रकाबाबत नागरिकांमध्ये जागृतीच नसल्याची माहिती पुढे आली आहे. शहरातील दुचाकी वितरकांकडून ज्यांनी दुचाकी खरेदी केल्या त्यांना दुचाकीसमवेत हेल्मेट मिळालेच नसल्याची माहिती पुढे आली आहे. दुचाकी खरेदी करताना संबंधित वितरक, खरेदीदाराकडून अर्ज भरून घेतो. यासंदर्भात शहरातील काही दुचाकी वितरकांकडे चौकशी केली असता, काही जण हेल्मेट हे मोफत देत नसून दुचाकीच्या एक्‍स-शोरूमच्या किमतीतच सुमारे एक हजार रुपये हेल्मेटसाठी समाविष्ट केलेले असल्याचे सांगितले. काही वितरकांच्या कार्यालयांमधील संबंधित कर्मचाऱ्यांनाच या नियमाबाबत काहीही माहिती नसल्याचे स्पष्ट झाले; तर काही वितरकांकडून असे सांगण्यात आले, की हेल्मेटचा दर्जा, रंग याबाबत ग्राहकांच्या अनेक अपेक्षा असतात. त्या पूर्ण करणे शक्‍य नसते. त्यामुळे आम्ही दुचाकींची विक्री करताना एक्‍स-शोरूमच्या किमतीत एक हजार रुपये समाविष्ट करीत नाही. 

दुचाकीच्या अपघाताचे प्रमाण वाढत असून, त्यामध्ये चालकांना व त्याच्या मागे बसणाऱ्यांना अनेकदा गंभीर इजा होत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले. हे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारने हेल्मेट खरेदीचे परिपत्रक काढले आहे.

शहरातील दुचाकी वितरकांची संख्या - २० 
जानेवारी ते जूनमध्ये विक्री झालेल्या दुचाकी - ४९,७४६

नवीन दुचाकी खरेदी करणाऱ्याला हेल्मेट देणे वितरकावर बंधनकारक आहे. ते न मिळाल्याची तक्रार अद्याप केली नाही. तशी तक्रार आल्यास संबंधित वितरकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.’ 
- आनंद पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मोशी

Web Title: two wheeler helmet compulsory