पुण्यात भाजपच्या मेळाव्यात दोन महिला पदाधिकाऱ्यांचा विनयभंग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात सोमवारी झालेल्या मेळाव्यात दोन महिला पदाधिकाऱ्यांचा विनयभंग करण्याचा प्रकार घडला. 

पुणे : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात सोमवारी झालेल्या मेळाव्यात दोन महिला पदाधिकाऱ्यांचा विनयभंग करण्याचा प्रकार घडला. 

या महिलांनी तिथे उपस्थित पुरूष पदाधिकाऱ्यांना या प्रकाराची माहिती दिली. मात्र, विषय वाढेल आणि पक्षाची बदनामी होईल असे सांगून या प्रकाराकडे दुर्लक्ष करण्यास सांगण्यात आले. या महिलांनी पक्षाच्या व्हाटस अप ग्रुपवर या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केल्याने तो इतरांना कळाला.  

नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सोमवारी पुणे दौऱ्यावर होते. त्यांच्या उपस्थित पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. पक्षाचे पदाधिकारी, आमदार, पालिकेतील पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित होते. कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. या गर्दीत पर्वती मतदारसंघातील पक्षाच्या दोन महिला पदाधिकारी पाटील यांना भेटण्यासाठी उभ्या होत्या. यावेळी काही कार्यकर्त्यांनी एकीचा  पदर आढण्याचा प्रयत्न केला तर दुसरीला चिमटा काढला. गर्दीत हे कृत्य नेमके कुणी केले हे त्यांच्या लक्षात आले नाही. या प्रकाराने या दोघी घाबरल्या. तात्काळ काही उपस्थित पदाधिकाऱ्यांना हा प्रकार सांगितला. मात्र, इथे पत्रकार आहेत. उगीच विषय वाढेल, असे त्यांना सांगण्यात आले. 

या महिलांनी मंगळवारी या घटनेबाबत पक्ष कार्यकर्त्यांच्या व्हॉटस ऍप ग्रुपवर संताप व्यक्त करीत या प्रकाराला वाचा फोडल्याने हा विषय सार्वत्रिक झाला. आपला पक्ष शिस्त पाळणारा आहे. मात्र, या घटनेनंतर पक्षात महिलांच्या सुरक्षिततेबाबत गांभीर्याने विचार कररण्याची गरज असल्याची भावना या ग्रुपवर व्यक्त करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two women violated at BJP Partyworkers meeting in Pune