पुणे : नीरा-बारामती रस्त्यावरील अपघातात दोन तरुणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 May 2020

वाघळवाडी (ता. बारामती) येथे नीरा-बारामती रस्त्यावर आज सायंकाळी झालेल्या जबर अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले.

सोमेश्वरनगर : वाघळवाडी (ता. बारामती) येथे नीरा-बारामती रस्त्यावर आज सायंकाळी झालेल्या जबर अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले. पुणे जिल्हा बँकेचे वाहनचालक (ड्रायव्हर) राजेंद्र विश्वनाथ भोंडवे (वय 39) व करंजे सोसायटीचे लेखनिक शरद गुळुंबे (वय 45) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही करंजेपुल (ता. बारामती) गावचे रहिवाशी आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नीरा-बारामती रस्त्यावर वाघळवाडी येथे आज सायंकाळी सातच्या दरम्यान वरील दोघे मित्र दुचाकीवरून (एमएच 42 एएम 8865) निरेच्या दिशेने निघाले होते. पाठीमागून आलेल्या इर्टीजा (एमएच 12 जेयू 3735) चारचाकीने पाठीमागून जोरदार ठोकर दिली. यामुळे दोघेही जागीच ठार झाले. चारचाकीचा चालक अपघातानंतर फरार झाला, मात्र त्याच्या सहकारी प्रवेशास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चालकावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे वडगाव निंबाळकर पोलिसांनी सांगितले.

पुण्यावर नामुष्की : ऍम्ब्युलन्स न आल्यानं रस्त्यावर एकाचा मृत्यू 

राजेंद्र भोंडवे हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या वाहनाचे चालक होते. करंजेपुलच्या माजी सरपंच लता भोंडवे यांचे ते पती होत. ते जिल्ह्यातील एक नामांकित चालक होते. संपूर्ण राज्य चारचाकीने फिरताना साधे खरचटलेही नव्हते मात्र छोट्या अपघातात गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. तर शरद गुळुंबे हे सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक रमाकांत गायकवाड यांचे भाचे होत. दोघा तरुणांच्या जाण्याने करंजेपुल गावात शोककळा पसरली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two youths killed in an accident on Nira-Baramati road

Tags
टॉपिकस
Topic Tags: