विद्यापीठांच्या स्तरावर जनता दरबार घेणार;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांचा निर्णय 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 January 2021

राज्यभरातील महाविद्यालये, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी यांना त्यांच्या कामासाठी मुंबई किंवा पुणे गाठावे लागते. विद्यार्थ्यांना देखील त्याचे प्रश्‍न सोडविण्यासाठी या शहरांमध्ये खेटे घालावे लागतात.

पुणे - विद्यापीठ, महाविद्यालये, प्राध्यापक, विद्यार्थी यांच्यासह इतरांच्या अनेक समस्या आहेत. त्यातील प्रत्येकाला मुंबईत मंत्रालयात येऊन कामे करून घेता येतातच असे नाही. यासाठी राज्यातील विद्यापीठांच्या स्तरावर जनता दरबार घेण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतला आहे. 

पहिला जनता दरबार सोमवारी (ता. २५) कोल्हापूर येथे घेतला जाणार आहे. त्यास ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @ कोल्हापूर असे नाव देण्यात आले आहे. याचपद्धतीने इतर विद्यापीठासाठी नाव असणार आहे. 

धक्कादायक! टेकडीवर जॉगिंगसाठी गेलेल्या पुणेकरांच्या 9 गाड्या फोडल्या​

तंत्र शिक्षण विभागाचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे, तर उच्च शिक्षण संचालनालय पुण्यामध्ये आहे. राज्यभरातील महाविद्यालये, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी यांना त्यांच्या कामासाठी मुंबई किंवा पुणे गाठावे लागते. विद्यार्थ्यांना देखील त्याचे प्रश्‍न सोडविण्यासाठी या शहरांमध्ये खेटे घालावे लागतात. त्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयच राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

उदय सामंत म्हणाले, ‘‘या उपक्रमात माझ्यासह उच्च व तंत्र शिक्षण खात्याचे प्रधान सचिव, सचिव, संचालक, सह संचालक, संबंधित विद्यापीठाचे कुलगुरू यासह मंत्रालयातील कक्ष अधिकारी यावेळी उपस्थित असतील. त्यामुळे तक्रारदारांच्या समस्यांचा निपटारा लगेच होऊ शकणार आहे. कोल्हापूरला हा उपक्रम होणार असून, आतापर्यंत बाराशे आॅनलाइन तक्रारी आलेल्या आहेत. याच पद्धतीने इतर विद्यापीठांमध्ये हा उपक्रम घेतला जाणार आहे. पुणे विद्यापीठातील प्रश्‍नांसाठी पुणे आणि नाशिक या दोन ठिकाणी या बैठका घेतल्या जातील. 

 पुण्यात मटणाचे दर का वाढले?; जाणून घ्या 4 प्रमुख कारणे​

प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना त्यांचे प्रश्‍न मांडण्यासाठी मुंबईमध्ये यावे लागते. हा त्यांचा त्रास कमी व्हावा, यासाठी प्रत्येक विद्यापीठाच्या स्तरावरच मंत्रालय आणण्यात येणार आहे. सगळे अधिकारी तेथे उपस्थित असल्याने त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी मदत होणार आहे. 
- उदय सामंत, मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभाग 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uday Samant decided to hold Janata Darbar at the state level