उजनीकाठावर भरली पक्षांची शाळा

कुंभारगाव (ता. इंदापूर) - उजनी जलाशयाच्या फुगवटा परिसरात आलेले स्थलांतरित रोहित पक्षी.
कुंभारगाव (ता. इंदापूर) - उजनी जलाशयाच्या फुगवटा परिसरात आलेले स्थलांतरित रोहित पक्षी.

भिगवण - इंदापूर तालुक्‍यातील भिगवण, कुंभारगाव, तक्रारवाडी, डिकसळ येथे स्थलांतरित रोहित (फ्लेमिंगो) पक्ष्यांचे आगमन झाले आहे. चालू वर्षी नियोजित वेळेच्या आधीच दोन महिने रोहित पक्ष्यांनी उजनी जलाशयावर उपस्थिती दर्शवत पक्षीनिरीक्षकांना सुखद धक्का दिला आहे. मोठ्या संख्येने पक्षी जलाशयावर आले आहेत. त्यामुळे सध्या पुण्यासह राज्यातील व देशभरातील पक्षीप्रेमींनी आपला मोर्चा उजनी धरणाच्या पाण्याच्या फुगवट्याकडे वळविला आहे.

उजनी परिसरामध्ये असलेली नीरव शांतता, रहदारीपासून दूर, खाण्यासाठी मुबलक अन्न, असे पूरक वातावरण या परिसरामध्ये आहे. त्यामुळे रोहित पक्षी सातत्याने येथे येत आहे. सध्या इंदापूर तालुक्‍यातील भिगवण, कुंभारगाव, डिकसळ, तक्रारवाडी येथे पक्ष्याचे थवे दिसत आहे. सुमारे तीन हजारांहून अधिक रोहित पक्षी सध्या असल्याचे पक्षीनिरीक्षकांनी सांगितले. पक्षीमित्रांचे प्रमुख आकर्षण असलेल्या रोहित पक्ष्यांचे चालू वर्षी वेळेआधीच आगमन झाल्यामुळे पक्षी निरीक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. पक्ष्यांची संख्या समाधानकारक असल्यामुळे पक्ष्यांचे हमखास दर्शन पर्यटकांना होत आहे.

हिवाळी पर्यटनासाठी उत्तम पर्याय 
उजनी जलाशय फुगवट्यावरील भिगवण, कुंभारगाव, डिकसळ आदी ठिकाणे हिवाळी पर्यटनासाठी एक उत्तम पर्याय म्हणून पुढे येत आहे. उजनी जलाशयाचा विस्तीर्ण परिसर, लाखो पक्ष्यांचा किलबिलाट, मच्छीमारांच्या होड्या, खमंग भोजन व सायंकाळी अस्ताला चाललेल्या सूर्याचे जलाशयामध्ये पडलेले प्रतिबिंब, असे विहंगम दृश्‍य सध्या येथे पहावयास मिळत आहे. उजनी परिसरात चालू वर्षी फ्लेमिंगो पक्ष्यांची संख्या समाधानकारक आहे, त्यामुळे पक्षीनिरीक्षकांची वर्दळ या भागांमध्ये वाढणार आहे.

साठ प्रकारचे पक्षी
रोहित पक्ष्यांबरोबरच राखी बगळे, पान कोंबड्या, बदक, सर्पमित्र दर्विमुख आदी सुमारे पन्नास ते साठ प्रकारच्या पक्ष्यांची गर्दी जलाशयावर पहावयास मिळत आहे. बगळ्यासारखी उंची, अग्निपंख, काटकीसारखे लांब पाय, उंच मान व रुबाबदारपणामुळे रोहित पक्षी हा पक्षीनिरीक्षकांच्या आकर्षणाचा केंद्र 
बिंदू ठरला आहे. या ठिकाणी पक्षीनिरीक्षकांसाठी सोईसुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com