कमावता माणूस परतेपर्यंत करू काय? 

PNE18O56380.jpg
PNE18O56380.jpg

पुणे : सकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर रोज दुपारी दोन-अडीच वाजता घरी जेवायला येणारा माणूस चार वाजले तरीही का आला नाही, हे विचारण्यासाठी मोबाईलवर फोन केला तर... पलीकडून पहिला प्रश्‍न आला, "तुम्ही कोण बोलतायं? मी ओळख सांगितल्यावर फोनवर पलीकडून बोलणाऱ्यांनी थेट सांगितले ""तुमचा नवरा गेलाय. "ससून'ला येऊन "डेडबॉडी' घेऊन जा... हे शब्द ऐकताच पायाखालची जमीन सरकली... काय करावं काहीच सुचेना... धावतपळत "ससून' गाठलं... काळजी करू नका, उमेश मोरे जिवंत आहेत, पण यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागणार आहे... फक्त या फॉर्मवर सही करा... सही करताच क्षणार्धात शस्त्रक्रियाही सुरू झाली... शस्त्रक्रियेनंतर आता चोवीस तास उलटले आहेत... घरातील कमवता एकच माणूस हॉस्पिटलमध्ये आहे... आता तो पुन्हा काम करेपर्यंत करायचे काय... असा अनुत्तरीत करणारा सवाल मोरे यांच्या पत्नी सुवर्णा यांनी शनिवारी "सकाळ'शी बोलताना केला.
 
जुन्या बाजारातील चौकात होर्डिंग पडल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. त्याखाली अडकलेल्या सहा रिक्षांपैकी मोरे यांची एक रिक्षा. जखमींपैकी सर्वांत जबर मार लागलेल्या मोरे यांच्या पत्नी बोलताना म्हणाल्या, ""शहरात काय घडलंय याची कोणतीच माहिती नव्हती. त्यामुळे मी त्यांना फोन केला; पण कानावर वेगळंच आलं.'' 

यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. त्यांच्यावर ससून रुग्णालयाच्या "ट्रॉमा आयसीयू'मध्ये उपचार सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर बोलताना सुवर्णा म्हणाल्या, ""घरात कमविणारे ते एकटेच आहेत. मी आणि तीन मुली या सगळ्यांची भिस्त त्यांच्यावरच आहे. तेच आता रुग्णालयात आहेत. आता आम्ही करायचे काय? आमच्याकडे शेती नाही की जी विकून रुग्णालयाचा पुढचा खर्च करू शकू. असेही कोणी नाही की, या परिस्थितीत आमच्या मदतीला धावून येतील. त्यामुळे ते परत कामावर जाईपर्यंत आम्ही करायचे काय?'' 

जखमी उमेश मोरे यांचे मेव्हणे बालाजी भोसले म्हणाले, ""उमरग्याजवळील एका छोट्या गावातून हे पुण्यात आले. सुरवातीला वाहनचालक म्हणून काम केले. गेल्या चार-पाच वर्षांपासून रिक्षा चालवतात. सांगवीमध्ये ते भाड्याच्या घरात राहतात.'' 

का नाकारली रेल्वेची आर्थिक मदत? 
रेल्वे प्रशासनाकडून आर्थिक मदत जखमी रुग्णांना देण्यात आली. मोरे यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांचा आर्थिक मदतीचा धनादेश प्रशासनाकडून आज देण्यात आला; पण तो त्यांनी नाकारला. या रुग्णावर घर अवलंबून असल्याने भविष्यात किती खर्च येईल, हे सांगता येत नाही. त्याच वेळी हा धनादेश देत असताना "ही रक्कम स्वीकारल्यानंतर रेल्वे प्रशासनावर भविष्यात या घटनेची कोणतीच जबाबदारी राहणार नाही,' यावर स्वाक्षरी घेतली जात आहे. अशा स्थितीत हा धनादेश कसा घ्यावा, असा प्रश्‍न नातेवाइकांना पडला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com