पूररेषांमध्येही अनधिकृत बांधकामे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मार्च 2017

पिंपरी - अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचे तसेच शास्तीकर माफ करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिले खरे; पण या आश्‍वासनालाच घोषणा मानत पिंपरी-चिंचवडकरांनी अनधिकृत बांधकामांचा धडाकाच लावला. केवळ मध्यवर्ती भागच नव्हे, तर महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या चऱ्होली, डुड्डुळगाव, चोविसावाडी, मोशी आदी गावांतील बांधकामांनाही वेग आला आहे. चऱ्होली गावठाण, ताजणेमळा आदी ठिकाणी तुलनेने अशा बांधकामांचे प्रमाण कमी असले, तरी डुड्डूळगाव, चोविसावाडी आणि मोशी गावठाणात ती जोरदारपणे सुरू असल्याचे निदर्शनास आले.

पिंपरी - अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचे तसेच शास्तीकर माफ करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिले खरे; पण या आश्‍वासनालाच घोषणा मानत पिंपरी-चिंचवडकरांनी अनधिकृत बांधकामांचा धडाकाच लावला. केवळ मध्यवर्ती भागच नव्हे, तर महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या चऱ्होली, डुड्डुळगाव, चोविसावाडी, मोशी आदी गावांतील बांधकामांनाही वेग आला आहे. चऱ्होली गावठाण, ताजणेमळा आदी ठिकाणी तुलनेने अशा बांधकामांचे प्रमाण कमी असले, तरी डुड्डूळगाव, चोविसावाडी आणि मोशी गावठाणात ती जोरदारपणे सुरू असल्याचे निदर्शनास आले. अनेक ठिकाणी पूररेषेमध्येही बांधकामे सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले. 

या बांधकामांविरोधात संथ गतीने कारवाई करण्यात येत असल्याने त्यांना बळ मिळते. बहुतांश ठिकाणी ग्रामपंचायतीच्या काळात बांधण्यात आलेल्या घरांच्या नूतनीकरणाच्या कारणाखाली नवीन बांधकामे सुरू असल्याचेही दिसून आले. मोशीमधील नागेश्‍वर मंदिरालगतच्या परिसरात बेकायदा बांधकामांचे प्रमाण जास्त आहे, तसेच अनेक ठिकाणी वाढीव बांधकामे सुरू असल्याचे आढळून आले. बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी महापालिकेच्या वतीने नोटिसा बजावण्यात येतात. मात्र, नोटिसांपलीकडे पुढील कोणतीही कारवाई होत नाही. परिणामी, दिवसेंदिवस त्यात भर पडत आहे.  

सहशहर आयुक्त प्रशांत पाटील म्हणाले, ‘‘बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यासाठी पोलिस संरक्षण मिळावे, असे पत्र पोलिसांना या पूर्वीच दिले आहे. परंतु, परीक्षा आणि अन्य तांत्रिक अडचणीमुळे पुरेसा फौजफाटा उपलब्ध नसल्याचे पोलिसांकडून कळविण्यात आले आहे. पोलिस बंदोबस्त उपलब्ध झाल्यास तत्काळ कारवाई हाती घेण्यात येईल.’’ 

कसा होणार गावांचा विकास?
शहराबरोबरच समाविष्ट गावांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना नवनिर्वाचित महापौर नितीन काळजे यांनी  महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. रस्ते, वीज, पाणी या मूलभूत विकासाचे घटक मानल्यास रस्त्यांचे रुंदीकरणाशिवाय पर्याय नाही. या रस्त्यांचे नियोजनबद्ध रुंदीकरण व्हावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. रस्ते रुंद करताना उपलब्ध रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात जागा हस्तांतरित करावी लागणार आहे. मात्र, यात अनेक घरे बाधित होणार आहेत.

‘सकाळ’ बातमीचा परिणाम...
‘सकाळ’मध्ये शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या आधारे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष्मीनारायणनगर, साईनगर भागातील बांधकामांची  गुरुवारी (ता. १६) पाहणी केली. त्यातील बहुतांश बांधकामे बेकायदा असल्याचे निदर्शनास आले असून लवकरच त्यांना नोटिसा बजावण्यात येईल, असे सहशहर आयुक्त प्रशांत पाटील यांनी सांगितले. 

Web Title: Unauthorized construction in the flood lines