अनिश्‍चितता अन् आश्‍चर्याचे धक्के!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

पुणे - ऐनवेळी झालेले पक्षांतर, अगदी वेळेवर उमेदवारी पत्र आल्याने झालेली धावपळ आणि शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असलेली उमेदवारीची रस्सीखेच... असे चित्र महापालिका निवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज भरताना शुक्रवारी दिसून आले. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षांमध्ये उमेदवार निश्‍चित करताना ऐनवेळी अनेक प्रभागांत धावपळ झाली. अनिश्‍चिततेच्या वातावरणामुळे काही ठिकाणी शिवसेनेला आपसूक उमेदवार मिळाले.

पुणे - ऐनवेळी झालेले पक्षांतर, अगदी वेळेवर उमेदवारी पत्र आल्याने झालेली धावपळ आणि शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असलेली उमेदवारीची रस्सीखेच... असे चित्र महापालिका निवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज भरताना शुक्रवारी दिसून आले. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षांमध्ये उमेदवार निश्‍चित करताना ऐनवेळी अनेक प्रभागांत धावपळ झाली. अनिश्‍चिततेच्या वातावरणामुळे काही ठिकाणी शिवसेनेला आपसूक उमेदवार मिळाले.

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस होता. महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांत त्याचे कामकाज सुरू होते. बहुतेक राजकीय पक्षांनी उमेदवार शेवटच्या दिवशी निश्‍चित केले. बंडखोरीची लागण होऊ नये आणि प्रतिस्पर्ध्यांना उमेदवार समजू नयेत, यासाठी पक्षांनी उमेदवारी याद्या जाहीर केल्या नाहीत. निश्‍चित झालेल्या उमेदवारांशी प्रमुख पक्षांच्या शहराध्यक्षांनी व्यक्तिगत संपर्क साधला आणि त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले, मात्र त्यानंतर निश्‍चित झालेल्या उमेदवारांचे अधिकृत उमेदवारी पत्र (एबी फॉर्म) भाजपला चार प्रभागांत बदलावे लागले. त्यासाठी चारही पक्षांतील इच्छुक राज्यस्तरीय नेत्यांशी संपर्क साधत होते. उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांकडून असंतोषाचा उद्रेक होऊ नये, यासाठी बहुतेक शहराध्यक्ष पक्षाच्या कार्यालयात न थांबता अन्य ठिकाणांहून त्यांच्या ‘टीम’सह कार्यरत असल्याचे दिसत होते. तरीही ऐनवेळी जाहीर केलेले उमेदवार, पक्षांतर, अनपेक्षित उमेदवार आदींमुळे आश्‍चर्य व्यक्त होत होते; तर उत्कंठा लागली होती आणि संताप अनावर झाल्याचेही दिसत होते.

एबी फॉर्मसाठी स्वतंत्र यंत्रणा
सर्वच राजकीय पक्षांतील बहुतेक उमेदवार निश्‍चित असले, तरी उर्वरित उमेदवार निश्‍चित करण्यासाठी प्रचंड धावपळ सुरू होती. त्यामुळे अनेक क्षेत्रीय कार्यालयांत काही प्रमाणात अनिश्‍चितता दिसत होती. ऐनवेळी निश्‍चित केलेल्या उमेदवारांसाठी सूचक-अनुमोदक जमविण्यापासून विविध कागदपत्रे गोळा करेपर्यंत सर्व प्रकारची धावपळ करावी लागत होती. पक्षाचा निरोप संबंधित उमेदवारांपर्यंत वेळेत पोचेल, यासाठी भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसने नेहमीप्रमाणे अनुभवी व्यक्तींची नियुक्ती केली होती; तसेच प्रमुख पक्षांकडून विविध पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एबी फॉर्म उमेदवारांपर्यंत पोचविण्यात आले; तर शिवसेनेने विविध क्षेत्रीय कार्यालयांत थेट एबी फॉर्म पोचविले.

प्रशासनावर आला ताण
या सगळ्या नाट्यात प्रशासनावर आज प्रचंड ताण आला. वास्तविक, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सात दिवस मिळाले होते. मात्र शेवटच्या दिवशीच बहुतेक सर्व अर्ज दाखल झाले. उमेदवारांचे समर्थक, कार्यकर्ते यांच्या गर्दीने क्षेत्रीय कार्यालये भरून गेली होती. त्यामुळे ध्वनिक्षेपकावरून वारंवार गर्दी कमी करण्याच्या सूचना देण्यात येत होत्या. निवडणूक कार्यालयात फक्त उमेदवाराला आणि सूचक-अनुमोदकालाच प्रवेश दिला जात असल्यामुळे तेथील गर्दी नियंत्रणात आली होती. तरीही काही ठिकाणी वादविवाद आणि गोंधळाची परिस्थिती उद्‌भवली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत तीन वाजेपर्यंत असली तरी, त्या वेळी कार्यालयात असलेल्या सर्व उमेदवारांच्या अर्जांची छाननी, स्वीकृती ही प्रक्रिया सायंकाळी पाच- सहा वाजेपर्यंत सुरू होती. उमेदवारी अर्ज दाखल करताना राज्य निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ हॅंग होत असल्याची तक्रार सार्वत्रिक होती.

कोलांट उड्या वाढल्या
हव्या असलेल्या पक्षाकडून उमेदवारी मिळत नाही, हे लक्षात आल्यावर दुसऱ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून उमेदवारी मिळवण्यात अनेक इच्छुकांना यश आले. भाजप आणि राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळालेल्या अनेक इच्छुकांनी शिवसेना, काँग्रेस, मनसेची वाट धरली; तर काही जणांनी अपक्ष म्हणूनही अर्ज दाखल केले. या घडामोडींमध्ये सर्वाधिक उमेदवार शेवटच्या क्षणी शिवसेनेला मिळाले. पक्षांतराच्या कोलांट उड्या मोठ्या संख्येने होत असल्यामुळे प्रमुख पक्षांना तर सायंकाळी उमेदवारांची अंतिम यादी तयार करणेही कष्टप्रद झाले होते.

Web Title: Uncertainty and surprises