बेरोजगारी, नैराश्‍यातूनच हल्ले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

पुणे - अमेरिकेत भारतीय वंशाच्या नागरिकांवर होणारे हल्ले सध्या चिंतेचा विषय बनले आहेत. वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील 26/11 चा हल्ला, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची "फर्स्ट अमेरिकन' ही भूमिका, अमेरिकेतील नोकऱ्यांसंदर्भातील नवे कायदे, एच वन बी व्हिसाबाबतचे धोरण, तसेच वाढती बेरोजगारी, ज्येष्ठांची वाढती संख्या, गुन्हेगारीकरण, सहज विकत मिळणारी घातक शस्त्रे या सगळ्याची पार्श्‍वभूमी त्याला आहे. अमेरिकेतील अनिवासी भारतीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अभ्यासकांनी याच्या कारणांविषयी "सकाळ'कडे व्यक्त केलेल्या भावना... 

पुणे - अमेरिकेत भारतीय वंशाच्या नागरिकांवर होणारे हल्ले सध्या चिंतेचा विषय बनले आहेत. वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील 26/11 चा हल्ला, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची "फर्स्ट अमेरिकन' ही भूमिका, अमेरिकेतील नोकऱ्यांसंदर्भातील नवे कायदे, एच वन बी व्हिसाबाबतचे धोरण, तसेच वाढती बेरोजगारी, ज्येष्ठांची वाढती संख्या, गुन्हेगारीकरण, सहज विकत मिळणारी घातक शस्त्रे या सगळ्याची पार्श्‍वभूमी त्याला आहे. अमेरिकेतील अनिवासी भारतीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अभ्यासकांनी याच्या कारणांविषयी "सकाळ'कडे व्यक्त केलेल्या भावना... 

ट्रम्प सरकारकडून नवीन रोजगारनिर्मिती व्हावी यासाठी अमेरिकन जनतेचा प्रचंड दबाव आहे. मुळात रोजगारनिर्मिती सरकारने करणे अपेक्षित असताना बाजारपेठांमधून रोजगारनिर्मिती व्हावी, असे धोरण सध्याच्या सरकारचे आहे. वाढत्या स्थलांतराद्वारे उपलब्ध नोकऱ्या आशियाई लोकांनी विशेषतः भारतीयांनी बळकावल्या अशी विरोधाची भावना अमेरिकेतील नैराश्‍यग्रस्त लोकांमध्ये वाढीस लागली आहे. ट्रम्प यांच्या धोरणामुळे अमेरिकन बेरोजगार तरुणांचा वाढता दबाव, असुरक्षित ज्येष्ठांची वाढती संख्या, वाढते गुन्हेगारीकरण, व्हिसा संदर्भातील धोरणात्मक निर्णयांमुळे नैराश्‍यातून आशियाई कर्मचाऱ्यांवर हल्ले वाढत आहेत. 
 अनिल बोकील, प्रणेते, "अर्थक्रांती' 

बेरोजगार अमेरिकन तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांचा एकाकीपणा, आर्थिक विवंचनेतून वाढलेल्या नैराश्‍यामुळे त्यांच्यातील वाढत चाललेली हिंसक मनोवृत्ती, खुल्या बाजारात सहज उपलब्ध असलेली घातक शस्त्रे यामुळे अमेरिकेतील सामाजिक सुरक्षितता धोक्‍यात आली आहे. शाब्दिक हिंसेपासून सुरू झालेले हल्ले अखेर शारीरिक हिंसेपर्यंत येऊन थांबले. भांडवलशाहीच्या जागतिकीकरणातील अपयश हेदेखील यामागचे प्रमुख कारण आहे. 
अजित अभ्यंकर, ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते 
 

अमेरिकेत राहात असलेल्या आशियाई आणि भारतीयांवरील हल्ल्यांच्या घटना गेल्या अनेक वर्षांपासून घडत आहेत. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात या हल्ल्यांच्या "रिपोर्टिंग'चे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. त्यामुळे या घटना एकाएकी वाढल्यासारखे वाटू लागले आहे. या हल्ल्यांमागे 
आर्थिक कारणे जरूर आहेत; परंतु इस्लामिक दहशतवादाच्या चौकटीचा संदर्भदेखील विसरता कामा नये. 
डॉ. श्रीकांत परांजपे, परराष्ट्र धोरणांचे अभ्यासक 

गेल्या वर्षभरापासून मी सॅन होजे विद्यापीठात एम.एस.चे शिक्षण घेतोय. तसेच, मी एका सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीसाठी कामही करतोय. अमेरिकेतील सर्वच हल्ले वंशद्वेषातून होत नसून, यामागे वैयक्तिक शत्रुत्वाची कारणेदेखील आहेत. कॅलिफोर्नियात असे हल्ले तुलनेने कमी होतात. ट्रम्प सत्तेवर आल्यापासून काही राज्यांत नैराश्‍यग्रस्त लोकांकडून हल्ले केले जातात. अमेरिकन लोक भारतीयांना सन्मान आणि मैत्रीनेच वागवतात, त्यांच्याविषयी तिटकारा बाळगत नाहीत. 
स्वप्नशील सोनकांबळे, विद्यार्थी आणि अभियंता 

गेल्या पाच वर्षांपासून मी मॅसॅच्युसेट्‌स शहरात पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतोय. 2011 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर वाढलेले हल्ले गैरसमजातून झाले होते. अमेरिकन लोकांना ओसामा बीन लादेन आणि शिखांमध्ये फरक करता येत नव्हता, हे त्यामागचे कारण होते. गेल्या दहा दिवसांत झालेल्या हल्ल्यांमागे स्थानिक कारणे असू शकतात, वंशभेद हे त्यापैकी एक कारण आहे. 
संदीप धाडवे, फाइव्ह स्टार हॉटेल शेफ 

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांमुळे, अमेरिकन फर्स्ट भूमिकेमुळे त्या ठिकाणच्या बेरोजगार तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांच्या असंतोषाला खतपाणी मिळत आहे. त्यांच्या आर्थिक विवंचनेला भारतीयच जबाबदार आहेत या भावनेतून हे हल्ले वाढले आहेत. अमेरिकेतील "बंदूक संस्कृती'मुळे आशियाई लोकांसोबत खुद्द अमेरिकन जनतेलाही अशा हल्ल्यांना सामोरे जावे लागत आहे. आर्थिक निर्बंध घालणारी धोरणे, रोजगारनिर्मितीमधील अपयश ही या हल्ल्यांमागची कारणे असावीत. 
- अरविंद गोखले, ज्येष्ठ पत्रकार 

Web Title: Unemployment, depression attacks