युनियन बॅंकेकडून वसुलीसाठी दादागिरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्‍यांत कर्जवसुलीसाठी सक्ती करता येत नाही, हा नियम डावलून युनियन बॅंकेने वसुली एजंटांमार्फत कर्जदारांवर दादागिरी करण्यास सुरवात केली आहे.

भवानीनगर - राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्‍यांत कर्जवसुलीसाठी सक्ती करता येत नाही, हा नियम डावलून युनियन बॅंकेने वसुली एजंटांमार्फत कर्जदारांवर दादागिरी करण्यास सुरवात केली आहे. युनियन बॅंकेच्या एका कथित अधिकाऱ्याने थेट शिविगाळ केल्याने ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्याने मंगळवारी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. 

दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्यांना सक्तीच्या वसुलीपासून सरकारने कागदोपत्री दिलासा दिला, मात्र प्रत्यक्षात बॅंका व खासगी वित्तीय कंपन्या दादागिरी करीत कर्जाची वसुली करीत असल्याचे आज पुन्हा सिद्ध झाले. यापूर्वी बारामतीतील दोन बॅंकांनी वसुली एजंट नेमून, शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली करण्याचा आदेश दिल्याचे उघड झाले होते. तर याच महिन्याच्या सुरवातीस काटेवाडीतील ट्रकमालक व त्याच्या पत्नीने वित्तीय कंपनीच्या एजंटाच्या त्रासाला कंटाळून विषप्राशन केल्याची घटना घडली होती. 

ग्राहक पंचायतीचे जिल्हा सचिव दिलीप निंबाळकर यांचे येथील युनियन बॅंकेत क्रेडिट खाते आहे. या खात्यातील रक्कम भरायची राहून गेली, ती सात हजारांच्या आसपास असल्याचे निंबाळकर यांचे म्हणणे होते. ती रक्कम मंगळवारी बॅंकेत भरू, असे सांगितले, मात्र सोमवारी (ता. 26) "युनियन बॅंकेतून बोलतोय' असे सांगत एकाने दमबाजी, शिविगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिलीप निंबाळकर यांनी भवानीनगर पोलिसांकडे दिली आहे. 

निंबाळकर यांच्याशी बोलताना वापरलेली भाषा चुकीची होती. ती आमच्याच अधिकाऱ्याने वापरली. वरिष्ठांनी त्यांना ताकीद दिली आहे. आम्ही एजंट ठेवलेले नाहीत, मात्र वसुलीची प्रक्रिया सुरू आहे. 
डी. एन. इंगळे, शाखा व्यवस्थापक, युनियन बॅंक 

बॅंक म्हणतेय, त्या अधिकाऱ्याविरुद्धच मी पोलिसांकडे तक्रार दिली आहे, मात्र संबंधित अधिकाऱ्याचा मोबाईल वापरला गेलेला आहे. त्यावर बोलणारी व्यक्ती ही वसुली एजंटच होती, हे नक्की आहे. त्याचा छडा लागला पाहिजे. 
दिलीप निंबाळकर, सचिव, ग्राहक पंचायत, पुणे जिल्हा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Union Bank has started debating lenders through collection agents