लोककलांचं विद्यापीठ व्हावं - डॉ. देखणे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

पिंपरी  - ""लोककला वाङ्‌मयाचे संशोधन होऊन त्या संहिताबद्ध झाल्या पाहिजे. त्यांचं विद्यापीठ झालं पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये विद्यापीठ आणि लोककला अकादमी झाली पाहिजे,'' अशी अपेक्षा तिसऱ्या अखिल भारतीय मराठी लोककला संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रामचंद्र देखणे यांनी केले. 

पिंपरी  - ""लोककला वाङ्‌मयाचे संशोधन होऊन त्या संहिताबद्ध झाल्या पाहिजे. त्यांचं विद्यापीठ झालं पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये विद्यापीठ आणि लोककला अकादमी झाली पाहिजे,'' अशी अपेक्षा तिसऱ्या अखिल भारतीय मराठी लोककला संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रामचंद्र देखणे यांनी केले. 

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि अखिल भारतीय नाट्य परिषद यांनी लोकरंग सांस्कृतिक मंचाच्या सहयोगाने तिसरे अखिल भारतीय मराठी लोककला संमेलन शुक्रवारी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सुरू झाले. त्याचे उद्‌घाटन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी डॉ. देखणे बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. संमेलनाचे मुख्य निमंत्रक लक्ष्मण जगताप, स्वागताध्यक्ष भाऊसाहेब भोईर. उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे लोककला व ललितकला विभागप्रमुख प्रवीण भोळे, लोककलांचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, महापालिकेचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे व्यासपीठावर उपस्थित होते. 

डॉ. देखणे म्हणाले, ""संत रचना आणि शाहिरीमध्ये मराठी मायबोली न्हाऊन निघाली आहे. लोककलांना नृत्य, नाट्य आणि साहित्याची जोड मिळाली आहे. लोककलांचे वेगवेगळे प्रकार केले जातात. त्यातील कीर्तन, प्रवचन या अध्यात्मिक आहेत. शाहिरीकाव्य वा पोवाडा हे मनोरंजनातून पुरुषार्थ जागविणारे आहे. गोंधळी, वाघ्या-मुरळी या लोकधर्माच्या पुरस्कर्त्या व लोकधर्म जागविणाऱ्या आहेत. तमाशा हा नृत्य व शृंगारिक आहे. भिल्ल, बंजारा नृत्य हे आदिवासी संस्कृतीचे प्रतीक आहे. वैदिक वाङ्‌मयाची ही परंपरा आहे. यात लोकांचं भावस्मरण आहे.'' 

""आपल्याला चार वेद माहिती आहेत. मात्र, लोककला हा पाचवा वेद आहे. त्याला लोकवेद म्हणतात. त्यामुळे नाटक, सिनेमात काम करणाऱ्या अभिजात कलावंतांप्रमाणे लोककलावंतांनाही मान द्यायला पाहिजे.'' 
- डॉ. रामचंद्र देखणे 

लोककलावंत विशारद पदवी मिळावी 
डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, ""सर्व लोककला या लोकाभिमुख आहेत. अंगणात उभे राहून त्या सादर केल्या जातात. त्यामुळे लोककलावंत हे लोकपीठ आहेत. त्यांचा शरीरभाव मनोरंजनाचा असला तरी, आत्मा प्रबोधनाचा आहे. लोककलावंत ही विशारद पदवी मिळाली पाहिजे. कारण, लोककला आणि मराठी भाषा यामुळे आपण नटलो आहोत. पण, आपण लोकपरंपरा विसरत आहोत. लोककलेचा आत्मा प्रबोधनाचा असल्यामुळे ती टिकविण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे.''

Web Title: university of folk arts Dr. Ramchandra Dekhane