विद्यापीठ ते पाषाण रस्ता वाहतुकीसाठी बंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 एप्रिल 2017

पुणे - महापालिकेच्या वतीने सेनापती बापट रस्त्यावर मुथा चेंबर्स ते एमएसईबी पंक्‍चर, तसेच पाषाण रस्त्यावरील श्री हॉटेल लेन ते सीआयडी कार्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत जलवाहिनीचे काम रविवारपासून (ता. 2) सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठ ते पाषाण चौक रस्ता, तसेच अन्य मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्‍त डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.

या कामामुळे रविवारी सकाळी सात वाजल्यापासून वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. त्यानुसार पुणे विद्यापीठ चौकातून पाषाणच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद राहील. पाषाणकडे जाणाऱ्या वाहनांनी बाणेर रस्ता यशदामार्गे अभिमानश्री चौकातून डावीकडे वळून तेथून पाषाणकडे जावे. सेनापती बापट रस्त्यावर विद्यापीठ चौकाकडे किंवा शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना शिवाजी हाउसिंग चौकापासून (जेडब्ल्यू मॅरिएट हॉटेल) पुढे प्रवेश बंद राहील.

नळस्टॉप भांडारकर रस्त्यावरून विद्यापीठ चौकाकडे येणाऱ्या वाहनचालकांनी खालील मार्गांचा वापर करावा :
- वेताळबाबा चौक ते दीप बंगला चौक- सूर्यमुखी चौकात (सेंट्रल मॉल) येऊन गणेशखिंड रस्त्याने/विद्यापीठ रस्त्याने विद्यापीठ पुलावरून बाणेर किंवा औंधच्या दिशेने जावे.
- शिवाजी हाउसिंग सोसायटी येथून उजवीकडे वळून ओम सुपर मार्केट चौक- सूर्यमुखी चौकमार्गे विद्यापीठ पुलावरून बाणेर किंवा औंधला जाता येईल.

काम होईपर्यंत रस्त्यांवर नो-पार्किंग
रेंज हिल्सकडून विद्यापीठ चौकात येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद राहणार असून, त्यांनी बाणेर किंवा औंध रस्त्याचा वापर करावा. जलवाहिनीचे काम पूर्ण होईपर्यंत या रस्त्यांवर दोन्ही बाजूला नो-पार्किंग करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन उपायुक्‍त डॉ. मुंढे यांनी केले आहे.

Web Title: university to pashan road transport close