पुणे विद्यापीठाने चंद्रशेखर आझादांच्या सभेला परवानगी नाकारली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

कोरेगाव भीमा येथील मागील वर्षीच्या हिंसाचार पार्श्वभूमीवर आणि 1 जानेवारीला विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आझाद पुण्यात येणार होते. याबरोबरच पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि एसएसपीएमएस या ठिकाणी आझाद यांची सभा होणार होती. मात्र विद्यापीठ प्रशासनाने त्यांच्या सभेला परवानगी नाकारली असल्याचे भीम आर्मीचे पुणे शहर प्रमुख दत्ता पोळ यांनी स्पष्ट केले आहे.

पुणे : भीम आर्मी या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांच्या सभेला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने परवानगी नाकारली आहे, तसेच रविवारी (ता. 30) एसएसपीएमएस मैदानावर होणाऱ्या सभेला ही पुणे पोलिसांकडून अद्याप कोणत्याही प्रकारची परवानगी मिळालेली नाही. 

कोरेगाव भीमा येथील मागील वर्षीच्या हिंसाचार पार्श्वभूमीवर आणि 1 जानेवारीला विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आझाद पुण्यात येणार होते. याबरोबरच पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि एसएसपीएमएस या ठिकाणी आझाद यांची सभा होणार होती. मात्र विद्यापीठ प्रशासनाने त्यांच्या सभेला परवानगी नाकारली असल्याचे भीम आर्मीचे पुणे शहर प्रमुख दत्ता पोळ यांनी स्पष्ट केले आहे.

याबरोबरच एसएसपीएमएस मैदानावर रविवारी (ता.30) होणाऱ्या सभेलाही पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नाही. याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या पातळीवर निर्णय घेतला जाईल, असे पोलिसांकडून सांगितले जात असल्याचे पोळ यांनी सांगितले. दरम्यान आझाद यांची शुक्रवारी मुंबई येथील दिंडोशी येथे सभा होणार होती. मात्र सभेपूर्वीच त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने भीम आर्मीच्या 31 डिसेंबरला होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारली. हा कार्यक्रम शिक्षणाच्या हेतुने घेण्यात येणार नव्हता, तसेच पोलिसांनीही या कार्यक्रमास परवानगी देण्यात येऊ नये, अशी विंनती केली होती. त्याप्रमाणे विद्यापीठाने कार्यक्रमास परवानगी नाकरली आहे. या कार्यक्रमात भीम आर्मी चे नेते चंद्रशेखर आझाद उर्फ रावण विद्यापीठात विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार होते. दरम्यान परवानगी नाकारली तरी हा संवाद विद्यापीठातील अनिकेत कँटीनमध्ये घेण्याचे भीम आर्मी चे नियोजन असल्याचा मेसेज फिरत आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या, आणि अशैक्षणिक कार्यक्रम विद्यापीठात होणे योग्य नाही, म्हणून परवानगी नाकारण्यात आली, असे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले आहे.

Web Title: University of Pune rejected permission for Chandrasekhar Azads meeting