पुणे - नवी नियमावली जाहीर, वाचा काय बंद आणि काय सुरू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जुलै 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील लॉकडाउनमध्ये काही प्रमाणात आणखी शिथिलता आणून महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी नवे आदेश काढले आहेत.

पुणे, ता. 31 : पुणे शहरात बाधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) व अत्यावश्‍यक सेवांची दुकाने उघडण्याचे नवे वेळापत्रक महापालिकेने शुक्रवारी जाहीर केले आहे. बाधित क्षेत्रातील दुकाने सकाळी आठ ते दुपारी 12 आणि त्यानंतर सायंकाळी पाच ते सहा यावेळेत सुरू राहतील. याआधी केवळ सकाळी आठ ते दुपारी बारापर्यंतच मुभा होती. अत्यावश्‍यक वगळता अन्य सर्व व्यवहार सम आणि विषम तारखेनुसार करता येतील. येत्या 31 ऑगस्टपर्यंत हे नियम लागू असतील. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील लॉकडाउनमध्ये काही प्रमाणात आणखी शिथिलता आणून महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी नवे आदेश काढले आहेत. भाजी मंडईतील दुकानेही दिवसाआड सुरू राहणार असून, ई-कॉमर्सच्या माध्यमातून अत्यावश्‍यक आणि बिगर अत्यावश्‍यक वस्तू घरपोच पोचविण्याची परवानगी आहे. सरकारी आणि खासगी कार्यालयांतील कामकाज मर्यादित मनुष्यबळात सुरू ठेवण्याचा पूर्वीचाच आदेश आहे. बाधित क्षेत्रातील व्यक्तींना विशेषतः: मोलकरणींना त्या क्षेत्राबाहेर काम करण्यास मनाई आहे. मात्र, घर मालकांच्या इच्छेनुसार काम करता येणार आहे, असे आदेशात स्पष्ट केले आहे. 

हे वाचा - पुण्यात दुधाचा तुटवडा होण्याची शक्यता

टॅक्‍सी, रिक्षा, चारचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या वाहतुकीसाठी सध्याचे (मर्यादा असलेले) नियम लागू आहेत. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारची बंधने कायम राहणार आहेत. नागरिकांनी आपापल्या भागातच खरेदी करावी, त्याशिवाय व्यावसायिकांनी कामगार, ग्राहकांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहनही आदेशात केले आहे. 

पथारी व्यावसायिकांना वेळेची मुदत 
शहरातील अधिकृत पथारी व्यावसायिकांना सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत व्यवसायाला परवानगी आहे. त्यासाठी विविध भागांतील (पूर्वीच्या आदेशातील) रस्त्यांची निवड करण्यात आली आहे. मात्र, या ठिकाणी ग्राहकांची गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्याची ताकीद व्यावसायिकांना दिली आहे. 

पुण्यातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मॉलला सायंकाळी सातपर्यंत परवानगी 
शहरातील मॉल आणि व्यापारी संकुले येत्या पाच ऑगस्टपासून उघडण्यात येणार आहेत. परंतु, ती सकाळी नऊ ते सायंकाळी सात याच वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. मात्र, त्यातील चित्रपटगृहे, हॉटेलमध्ये बसून ग्राहकांना सेवा पुरविता येणार नाही. पण त्याठिकाणाहून पार्सल देता येणार असल्याचे आदेशात स्पष्ट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unlock 3 new guidelines from pune municipal corporation